पश्‍चिम महाराष्ट्रास अविरत जलाभिषेक; मोठ्या धरणांतून विसर्ग सुरु..!

rains
rains

पुणे - मॉन्सूनच्या सुखद आगमनानंतर सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे मुंबई, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर अशा पश्‍चिम महाराष्ट्रातील मुख्य शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अत्यंत वेगाने जलवृद्धी होत आहे. मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या तलावांसहित भंडारदरा, कोयना, पानशेत, पवना, खडकवासला, चास कमान यांसारख्या पश्‍चिम महाराष्ट्रातील विविध धरणांमध्ये अत्यंत वेगाने पाण्याची आवक होत आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांत यंदा विक्रमी पाणीसाठा झाला असून गेल्या वर्षाच्या (2016) तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे. मुंबईच्या तलावांमध्ये आजच्या दिनांकास गेल्या वर्षी झालेला पाणीसाठी हा 56% होता. या वर्षी तलावांतील पाणीसाठा आत्ताच 80% टक्के झाला आहे. मुंबईला वर्षभर पाणी पुरठा करण्यासाठी 14 लाख 73 हजार दशलक्ष पाणी साठा जमा असणे आवश्‍यक आहे. सध्या 11 लाख 76 हजार दशलक्ष पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या 24 तासात या तलावांच्या परीसरात 80 ते 90 मि.मी पाऊस झाला आहे.

मुंबईच्या तलावांमधील एकूण पाणीसाठा
तानसा - 145080 दशलक्ष लीटर
भातसा - 717037 दशलक्ष लीटर
अप्पर वैतरणा - 227047 दशलक्ष लीटर
मध्य वैतरणा - 193530 दशलक्ष लीटरजफफ
सागर - 128925 दशलक्ष लीटर

तलावांबरोबरच नवी मुंबईतही मुसळधार पाऊस सुरूच आहे. मुंबईत आज पावसाचा जोर वाढला असून पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने शहराच्या सखल भागात पाणी भरले आहे. अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरीवली, जोगेश्वरी, माटुंगा, मुलुंड, कुर्ला या भागांत पाणी भरल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी वाहतूक तुंबली आहे. आज सकाळी 11 वाजता समुद्राला मोठी भरती येणार असून समुद्रात 4.62 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. भरतीच्या वेळी जोरदार पाउस पडल्यास सावधगिरी बाळगण्याचा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे.

कोयना धरणाची पातळी 2125.1 फूट

कोयना धरण परिसरात चोवीस तासात पावसाचा जोर ओसरला आहे. चोवीस तासात झालेल्या पावासाने कोयना धरणाच्या पाणी साठ्यात १.७७ टीएमसीने वाढ झाली.

पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणाची पाणी पातळी पावणे दोन टीएमसीने पाणी साठ्यात वाढ झाली. कोयनेत ६७.४९ टीएमसी पाणी साठा होता. चोवीस तासात कोयनानगरला ९६ (२६०१) मिलीमीटर, नवजाला ३८ (३००४)  पावसाची नोंद झाली.

कोयना धरणाच्या पाणीपातळीत चार फुटाने वाढ झाली असुन एकुण पाणीपातळी २१२५.१ फुट आहे. दोन दिवसाच्या तुलनेत पावसाचा जोर कमी झाला तरी धरणात सध्या ६१ हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

भंडारदरा 80% भरले; रतनवाडीत अतिवृष्टी

भंडारदरा पाणलोटक्षेत्रातील रतनवाडी येथे १२ इंच पाऊस पडून अतिवृष्टी झाली असून सर्वदूर जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने मुळा पाणलोट क्षेत्रात मोठी जलवृद्धी झाली आहे. भंडारदरा जलाशयात तीव्र गतीने पाण्याची आवक होत असून सकाळी धरणात ८७५८ दशलक्ष घनफूट साठा होता. सकाळपासूनच पावसाने अधिक जोर धरल्याने सायंकाळपर्यँत धरण भरण्याच्या अंतिम टप्प्यात जाईल.

परिसरातील शेती जलमय झाली असून भात रोपे पाण्यात बुडाली आहेत. ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. घाटघर येथे मोठ्या प्रमाणात धुके असून धुक्यात वाट काढण्यासाठी पर्यटक आपल्या गाड्यांचे दिवे लावून प्रवास करताना दिसत आहेत. "जिल्ह्याची चेरापुंजी' असलेल्या या भागात पावसाचा जोरदार तडाखा बसल्याने जनावरे व माणसे गारठली आहेत . 

भंडारदरा जलाशयात ८३६ दशलक्ष घनफूट, मुळामध्ये ७५९ दशलक्ष व निळवंडेत ६२३ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. हरिशचंद्रगड परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने मुळा नदीतून १५ हजार क्युसेक्सने, प्रवरा मधून ५ हजार क्युसेक्सने व गोदावरी मधून ३०९४५ क्युसेक्सने पाणी वाहत आहे. त्यामुळे मुळा व प्रवरा परिसराच्या पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

लोणावळ्यास जोरदार पावसाने झोडपले
पर्यटकांचे मोठे आकर्षण केंद्र असलेल्या लोणावळ्यासही जोरदार पावसाने झोडपले असून गेल्या 24 तासांत 220 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. लोणावळ्यात आत्तापर्यंत एकूण 2980 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून भुशी धरणाच्या सांडव्यावरुन आता अत्यंत वेगाने पाणी वाहत असल्याने पोलिसांकडून पर्यटकांना धरणावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

पुणे - खडकवासला 100% भरले
खडकवासला धरण 100 टक्के भरलेे, (1.97 टिएमसी) मुठा नदीत आज पहाटे 3500 क्यूसेक एवढा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता.  आज सकाळी 10 वाजता 7000 क्युसेक पाणी विसर्ग करण्यास सुरवात केली आहे. पिंपरी चिंचवड शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये आजच्या ताज्या आकडेवारीनुसार 6.997 टीएमसी इतका उपयुक्त पाणी साठा झाला आहे. धरण 82.19 % इतके भरले असून दिवसातील एकूण पाऊस 99 मीमी इतका झाला आहे. या क्षेत्रात 1 जून पासून एकूण पाऊस 1849 मीमी इतका झाला आहे.

नाशिक: सततच्या पावसानंतर सतर्कतेचा इशारा
नाशिक जिल्ह्यात बरेच भागात पाऊस सुरू आहे व धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे,  जंगल भागात पावसाचा व धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी धोक्याच्या ठिकाणांपासून व  पूर पाण्यापासून सुरक्षितता बाळगावी, असा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून देण्यात येत आहे.

धरणांतील विसर्ग वेळ सकाळी 10 वाजता
गंगापूर 2496 क्युसेक्स 
दारणा 13980 क्युसेक्स 
कडवा  6834 क्युसेक्स 
नांदूर मध्यमेश्वर  30945 क्युसेक्स 
होळकर पूल  4090 क्युसेक्स 

चास कमान धरणांतूनही विसर्ग वाढवला
खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाचा जोर कायम असून चास कमान धरणाचे पाचही दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात 5990 क्‍यूसेक्‍स वेगाने पाणी सोडण्यात आले होते. मात्र पावसाचा जोर वाढल्याने आज (शनिवार) सकाळी 10 वाजता 14815 क्‍युसेक्‍सने नदी पात्रात विसर्ग करण्यास सुरुवात झाली.

कोल्हापूर भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली असून येथील राधानगरी धरण 86% इतके भरले आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com