शिवराज्याभिषेक सोहळ्यात यंदा जल व्यवस्थापन, युद्धकलेचा थरार

शिवराज्याभिषेक सोहळ्यात यंदा जल व्यवस्थापन, युद्धकलेचा थरार

कोल्हापूर - यंदा दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात जल व्यवस्थापन, युद्धकलेचा थरार व पालखी सोहळा आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची जय्यत तयारी सुरू आहे. युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांसाठी राज्यातील शेकडो आखाड्यांना आमंत्रित केले जात आहे.

समितीतर्फे ‘लोकोत्सव’ व ‘राष्ट्रीय सण’ म्हणून शिवराज्याभिषेक साजरा केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची दुर्गांवरील जलनीती कशी होती, याबाबत प्रबोधन केले जाईल. सध्या टंचाईच्या झळा तीव्र भासत असून, त्यावर उपाययोजना कशी करावी, याविषयी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.

महाराष्ट्राच्या पराक्रमाचा वारसा सांगणाऱ्या युद्धकलेचे आखाडे राज्यात सर्वत्र आहेत. मात्र, या कलेची ओळख देशभरात म्हणावी तशी झालेली नाही. केरळमधील ‘कलारीपयट’ ही युद्धकला संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. तशी ओळख महाराष्ट्रातील शिवकालीन युद्धकलेला करून देण्यासाठी ‘जागर शिवकालीन युद्धकलेचा’ या संकल्पनेंतर्गत होळीच्या माळावर कलेचे सादरीकरण केले जाणार असून, त्यासाठी आचारसंहिता तयार केली जात आहे.

सहभागासाठी आवाहन
‘सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्‍याचा’ या संकल्पनेंतर्गत अठरापगड जाती-धर्मातील लोकांना एकत्र आणून सामाजिक एकोप्याचा संदेश दिला जाणार आहे. ६ जूनला राज्याभिषेक झाल्यानंतर नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्‍वर मंदिरापर्यंत काढण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्यात पारंपरिक लोककलांचा सहभाग असेल. युद्धकला प्रात्यक्षिक व पालखी सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ज्येष्ठ शस्त्र संग्राहक गिरीश जाधव, हेमंत साळोखे, प्रवीण हुबाळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com