पंचगंगेचे पाणी रात्रीत १५ फुटांनी वाढले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

कोल्हापूर - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत चोवीस तासांत तब्बल १५ फुटांनी वाढ झाली. नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले. शहरात दुपारनंतर पावसाचा जोर कमी राहिला असला, तरीही पाणलोट क्षेत्रासह ग्रामीण भागात धुवाँधार पाऊस सुरूच राहिला. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. 

कोल्हापूर - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत चोवीस तासांत तब्बल १५ फुटांनी वाढ झाली. नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले. शहरात दुपारनंतर पावसाचा जोर कमी राहिला असला, तरीही पाणलोट क्षेत्रासह ग्रामीण भागात धुवाँधार पाऊस सुरूच राहिला. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. 

दरम्यान, पंचगंगेसह जिल्ह्यातील इतर नद्यांवरील २८ बंधारे पाण्याखाली असून त्यांवरील वाहतूक काही ठिकाणी बंद आहे. काही ठिकाणी पर्यायी मार्गाने सुरू आहे. काल सकाळी पंचगंगेची पाणीपातळी १४ ते १५ फुटांपर्यंत होती. आज सायंकाळपर्यंत हेच पाणी ३० ते ३२ फुटांपर्यंत पोचले. कालपर्यंत जिल्ह्यातील सात बंधाऱ्यांवर पाणी होते. आज रात्रीपर्यंत तब्बल २८ बंधाऱ्यांवर पाणी आले. राधानगरी धरणांमध्ये ७.५ टीएमसी पाणीसाठा आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून १.३६ टीएमसी पाणीसाठा आवश्‍यक आहे. पावसामुुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील डांबरी रस्त्यांची दैना उडाल्याचे चित्र आहे. 

दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाळा की उन्हाळा हेच समजत नव्हते. कधी ढग, तर कधी उन्हाचा तडाखा असल्यामुळे पावसाळा कमी आणि उन्हाळाच जास्त अशी परिस्थिती होती. त्यामुळे, जिल्ह्यातील नद्यांना आलेला पूर बघता बघता कमी झाला होता. त्यानंतर, दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतलेली नाही. हातकणंगले, शिरोळ, कागल तालुक्‍यात पावसाने झोडपून काढल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याला व्यापून टाकले. 

सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील महत्त्वाचे मार्ग सुरू होते; पण पावसाचा जोर पाहता लवकरच गगनबावड्यासारखे काही मार्ग पाण्याखाली जाऊ शकतात. 

धुवाँधार पावसाने ऊस, भात, भुईमूग, सोयाबीनच्या शेतामध्ये पाणी साचून राहिले आहे. ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे बालिंगा, पाडळी खुर्द, कोगे येथील ओढ्याकाठची शेत जमीन जोरदार पाण्याने वाहून गेली आहे. 

सेल्फीसाठी अनावश्‍यक धाडस 
जिल्ह्यात महत्त्वाच्या मार्गावर असणाऱ्या बंधाऱ्यावर पाण्यामध्ये जाऊन सेल्फी काढण्याचे फाजिल धाडस केले जात आहे. यामध्ये काही तरुणींचाही पुढाकार दिसून येत आहे. राजाराम बंधारा, महे (ता. करवीर) येथील नदीवरील पुलासह इतर ठिकाणी असे धोकादायक पद्धतीने सेल्फी घेताना तरुणाई सर्रास आढळत आहे.

दृष्टिक्षेपात

 •  राधानगरी धरणात ८५ टक्के पाणीसाठा
 •  काळम्मावाडी (दूधगंगा) ७२ टक्के भरले
 •  वारणा ७५ टक्के भरले
 •  कोयना धरणात २४ तासांत ६ टीएमसी पाण्याची वाढ
 •  २८ बंधारे पाण्याखाली
 •  आजही अतिवृष्टीचा इशारा
 •  सर्वाधिक पाऊस 
 •  वारणा नदीवर काखे-मांगले पुलावर पाणी, वाहतूक बंद
 •  अलमट्टी धरणात ११८.५५ टीएमसी पाणीसाठा
 •  राधानगरीतून विसर्ग सुरू
 •  लक्ष्मीवाडी तलाव तीन महिने अगोदरच ओसंडला
 •  कळंबा तलाव भरण्याच्या मार्गावर
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The water of Panchagang increased by 15 feet at night