पाणी नियोजनाला महत्त्व जिल्ह्याची भिस्त उजनीवर 

संतोष सिरसट
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

सोलापूर : पुढील काही आठवड्यात जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता जाणवण्यास सुरवात होईल. पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने दुष्काळाच्या झळा जिल्हावासियांना सहन कराव्या लागणार आहेत. पुणे जिल्ह्यातील पावसाने उजनी शंभर टक्के भरले असले तरी दुष्काळी स्थितीत त्या पाण्याच्या नियोजनाला खूपच महत्त्व येणार आहे. कठीण काळात सगळी भिस्त उजनीवरच असेल.

सोलापूर : पुढील काही आठवड्यात जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता जाणवण्यास सुरवात होईल. पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने दुष्काळाच्या झळा जिल्हावासियांना सहन कराव्या लागणार आहेत. पुणे जिल्ह्यातील पावसाने उजनी शंभर टक्के भरले असले तरी दुष्काळी स्थितीत त्या पाण्याच्या नियोजनाला खूपच महत्त्व येणार आहे. कठीण काळात सगळी भिस्त उजनीवरच असेल.

मागील वर्षीही धरण शंभर टक्के भरले होते. मात्र, त्यावेळी शेतकऱ्यांची मागणी नसतानाही धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली होती. त्यातच मागील वर्षी पाऊस बऱ्यापैकी असल्यामुळे त्याची दाहकता जाणवली नाही. यंदा मात्र नेमकी उलटी स्थिती आहे. ऑक्‍टोबर महिन्यापासूनच दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्यासाठीची सारी भिस्त उजनी धरणावर अवलंबून आहे. यापूर्वी उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी झाला नव्हता. 

यंदाही तीच स्थिती राहण्याची शक्‍यता आहे. उजनी कालवा समितीच्या बैठकीत एक नोव्हेंबरपासून कालवा व बोगद्यातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्यानंतर सोलापूरसाठी भीमा नदीतूनही पाणी सोडावे लागणार आहे. यंदाच्या वर्षी उजनीच्या पाण्याला सोन्याचा भाव येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे सोने जपून हाताळतो तीच गत पाण्याच्या बाबतीतही होण्याची शक्‍यता आहे. कालवा नियोजन समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मार्चमध्ये पुन्हा बैठक घेऊन उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्याचा निर्णय होणार आहे. पण, यंदाची दुष्काळी स्थिती पाहता उन्हाळ्यात शेतीला पाणी सोडणार की नाही? याबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

रिक्त पदे भरण्याची गरज 

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उजनी धरणातील पाण्याचे नियोजन केले जाते. एकीकडे पाण्याचे नियोजन व्यवस्थित होण्याची मागणी करत असताना त्याठिकाणी असलेली रिक्त पदे भरणेही तितकेच महत्वाचे आहे. ही पदे रिक्त असल्याने पाण्याचे नियोजन करताना अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. ते टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात अधिकारी-कर्मचारी असणे गरजेचे आहे. त्याने पाण्याचे योग्य नियोजन करणे शक्‍य होईल. 

Web Title: Water planning is important for the district