'औज'कोरडा; पाण्यावरून पुन्हा शिमगा 

विजयकुमार सोनवणे 
शनिवार, 19 मे 2018

बंधारा कोरडा पडला तरी पंधरा दिवस पुरेल इतके पाणी टाकळी इंटकवेल मध्ये आहे. उजनीतून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करु.
- विजय देशमुख, पालकमंत्री

सोलापूर : शहराला पाणीपुरवठा होणारा औज बंधारा कोरडा पडला आहे. टाकळी येथील भीमा नदीत आठ फूट पाणी आहे. हे पाणी 15 दिवस पुरेल. त्यानंतर पाण्यावरून शहरात पुन्हा "शिमगा'होणार आहे. 

शिवसेनेचे नगरसेवक विनायक कोंड्याल, अमोल शिंदे, देवेंद्र कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर, उमेश गायकवाड, भरतसिंग बडुरवाले, किरण पवार यांनी औज बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली. 

बंधाऱ्याचा संपूर्ण परिसर कोरडा पडला आहे. टाकळीच्या दिशेने जाणाऱ्या पाण्यातही पंप लावून उपसा केला जात आहे. केवळ नियोजन नसल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी  स्पष्ट झाले. 

बंधाऱ्याच्या पात्रात चर पाडून पाणी घेतले जात आहे. कर्नाटकच्या दिशेने असलेल्या शेतासाठी पाण्याचा उपसा सातत्याने सुरू आहे. कर्नाटकच्या हद्दीत पाणी साठवून ठेवले तर त्याचा सातत्याने उपसा होतो. त्यामुळे हे पाणी टाकळीच्या दिशेने सोडण्यात आले आहे. परिणामी बंधाऱ्याचे एका बाजूचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. या पात्रामध्ये शेळ्या बिनधास्तपणे फिरत आहेत. बंधाऱ्यात लावण्यात आलेल्या मोटारी उघड्या पडल्या आहेत. पाच ते सहा बर्गे वगळता इतर दरवाज्यांमध्ये साडेचार मीटरपर्यंत बर्गे लावले आहेत. 

बंधारा कोरडा पडला तरी पंधरा दिवस पुरेल इतके पाणी टाकळी इंटकवेल मध्ये आहे. उजनीतून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करु.
- विजय देशमुख, पालकमंत्री

बंधारा कोरडा पडल्याची माहिती प्रशासनाने नगरसेवकांना दिली नाही. ही स्थिती निर्माण झाल्यावर लगेच पाणी सोडण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्‍यक होते. मात्र, तसे झाल्याचे दिसून येत नाही. 
- देवेंद्र कोठे, नगरसेवक 

पाणी असूनही सोलापूरकरांना चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरवासीयांना मुबलक पाणी देण्यासाठी दोन्ही मंत्र्यांनी प्रयत्न करणे आवश्‍यक होते. मात्र, तसे प्रयत्न झालेले नाहीत. 
- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक

Web Title: water problem in Solapur