टेंभुच्या पाण्यासाठी सांगोल्यातील १४ गावांचा पाणीप्रश्न पेटणार

टेंभुच्या पाण्यासाठी सांगोल्यातील १४ गावांचा पाणीप्रश्न पेटणार

संगेवाडी (सोलापुर) : सांगोला तालुक्यातील मानकाठावरील १४ गावातील टेंभु योजनेच्या पाण्यासाठीच्या जनआंदोलनाला शेतकऱ्यांमधुन मोठा पाठिंबा मिळत आहे. पाण्यासाठी तरुणांनी सुरु केलेल्या या बिगरराजकीय लढ्यामुळे तालुक्यातील पाणीप्रश्न पेटणार आहे. १ नोव्हेंबरपासुन तहसीलसमोर जनावरांसहीत बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे या पाणी संघर्ष क्रुती समीतीने सांगितले आहे.

मानकाठावरील तरुण एकत्रीत येवुन टेंभु योजनेतुन माननदीत पाणी सोडावे यासाठी लढा सुरु केला आहे. या गावांतील निवडक तरुणांनी १४ गावांतील पाणी संघर्ष क्रुती समिती स्थापन केली आहे. यावर्षी पाऊस नसल्याने तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणार आहे. पुढील काही दिवसांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आता पाणी नाही मिळाले तर अनेक गावांना पिण्यासाठी देखील पाणी मिळणार नाही हा धोका ओळखून या लाभक्षेत्रातील मान नदीकाठच्या गावातील तरुण एकत्रीत येऊन त्यांनी टेंभूच्या पाण्यासाठी लढा उभा केला आहे. या प्रत्येक १४ गावांत जाऊन शेतकऱ्यांना एकत्रीत करुन सभा घेतल्या जात आहेत. या सभांना सध्या मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे टेंभुचा पाणीप्रश्न पुन्हा पेटणार आहे.

टेंभुचे पाणी सध्या बुद्धेहाळ तलावात सुरु असून त्याचा वेग वाढवून मेथवडेपर्यंत प्रथम पाणी सोडून पुढे टप्प्या-टप्प्याने यावरील बंधारे भरल्यास पुढील पिण्याचा व जणावरांचा पाणीप्रश्न काही अंशी तरी मिटेल, अशी मागणी तरुणांमधून होत आहे. तालुक्यातील वाटंबरे, येलमार मंगेवाढी, नाझरे, चिणके, अनकढाळ, अकोला, वासुद, सांगोला, कडलास, वाढेगाव, सावे, बामणी, मांजरी, मेथवडे आदी गावांतील तरुणांनी टेंभुच्या पाण्यासाठी एकत्रीत येवुन संघर्ष करीत आहेत.

टेंभु योजनेतुन सांगोला तालुक्यासाठी ५ हजार ५०० एमसीएफटी पाणी मंजुर असुन त्यापैकी ३०० एमसीएफटी पाणी बुद्धेहाळ तलावात सोडले जात आहे. यामधील उरलेले आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळावे यासाठी संघर्ष सुरु आहे -  डॉ. विजय बाबर, (सदस्य, पाणी संघर्ष क्रुती समिती)

१४ गावाच्या पाण्यासाठी १ नोव्हेंबर पासुन जणावरांसहीत तहसीलसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. पाणी मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही - नंदू शिंदे, (सदस्य, पाणी संघर्ष क्रुती समिती)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com