लाचखोर जलसंपदा अभियंत्याची पोलिस कोठडीत रवानगी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

अधीक्षक अभियंता कांबळेच्या बँक लॉकरमधून अडीच लाखांचे दागिने, 80 कोरे बॉंड जप्त केले आहेत. त्याचे सोलापुरात दोन बंगले, दोन दुकान गाळे, पुण्यात आठ फ्लॅट, कोल्हापुरात एक आणि ठाण्यात एक फ्लॅट असल्याचे समोर आले आहे. 

सोलापूर - अनामत म्हणून भरलेली 14 लाख 16 हजार 645 रुपयांची रक्कम परत देण्यासाठी 80 हजारांची लाच स्विकारणारा जलसंपदा विभागाचा अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे आणि त्याचा वाहनचालक कैलास अवचारे या दोघांची 31 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अधीक्षक अभियंता कांबळेच्या बँक लॉकरमधून अडीच लाखांचे दागिने, 80 कोरे बॉंड जप्त केले आहेत. त्याचे सोलापुरात दोन बंगले, दोन दुकान गाळे, पुण्यात आठ फ्लॅट, कोल्हापुरात एक आणि ठाण्यात एक फ्लॅट असल्याचे समोर आले आहे. 

अधीक्षक अभियंता कांबळे आणि त्याचा वाहनचालक अवचारे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी जुळे सोलापुरातील घरातून अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक घरी आल्याचा संशय आल्याने अधीक्षक अभियंत्याने ती रक्कम वाहनचालकास घराबाहेर टाकण्यास लावली होती. दोघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यू. जी. हेजीब यांनी दोघा आरोपींना 31 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

या कारवाईनंतर पोलिसांनी कांबळेच्या बँक खात्याची चौकशी करण्यास सुरवात केली आहे. जुळे सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या लॉकरमधून सात तोळे सोने आणि चांदीचे दागिने, असा एकूण अडीच लाखांचा ऐवज सापडला आहे. तसेच 80 कोरे बॉंड, घराची कागदपत्रे सापडली आहेत. कांबळे याची पत्नी डॉक्‍टर असून सोलापुरात दवाखाना असल्याचे समोर आले आहे. 
या प्रकरणात न्यायालयात सरकारतर्फे अॅड. शीतल डोके, आरोपी कांबळे आणि अवचारेतर्फे अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. प्रशांत नवगिरे हे काम पाहत आहेत. 

राजकुमार कांबळे यांच्या बँक लॉकरमधून अडीच लाखांचे दागिने मिळाले आहेत. तसेच सोलापूर, पुणे, ठाणे, कोल्हापूर येथे फ्लॅट असल्याचे समोर आले आहे. 80 कोरे बाँडही सापडले आहेत. सापडलेली मालमत्ता अपसंपदा असेल तर त्याचा वेगळा गुन्हा दाखल होईल, अशी माहिती सोलापूर एसीबी उपअधीक्षक अरुण देवकर यांनी दिली. 

Web Title: water resources engineer has been sent to the police custody