नऊ हजार पाणी नमुने तपासणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

अपुऱ्या लॅब
जिल्ह्यात केवळ सोमर्डी (ता. जावळी), दहिवडी (ता. माण), कऱ्हाड व खंडाळा येथे पाणी तपासणी प्रयोगशाळा आहेत. साताऱ्यात जिल्हास्तरीय प्रयोगशाळेचे सध्या काम सुरू आहे. परंतु, ती अद्याप कार्यान्वित नाही. जिल्ह्यातील सर्व पाणी नुमन्यांचा ताण या चार प्रयोगशाळांवर येत असतो. त्यामुळे ही संख्या वाढवून प्रत्येक तालुक्‍यात एक प्रयोगशाळा उभारल्यास पाणी तपासणी वाढली जाईल.

सातारा - ‘पाणी म्हणजेच जीवन,’ असे म्हणत आपण बिनधास्तपणे त्याचे आचमन करतो. पण, ते किती शुद्ध आहे, हे आपणला माहितीच नसते. आता जिल्हा परिषदेतर्फे केवळ प्रमुख गावांतील नव्हे तर सर्व गावांसह वाड्यावस्त्यांवरील पाण्याच्या जलस्त्रोतांची तपासणी केली जात आहे. तब्बल नऊ हजार ३१० पाणी नुमने घेतले जाणार असून, मेअखेरपर्यंत त्याची तपासणी केली जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य व जिल्हा पाणी स्वच्छता विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी तसेच पावसाळ्यानंतर अशा दोन टप्प्यात रासायनिक तपासणी केली जात आहे. पावसाळ्यापूर्वीची ग्रामीण भागातील जलस्त्रोतांची तपासणी २० मार्चपासून केली जात आहे. पूर्वी केवळ प्रमुख गावांतील पाण्याचे जलस्त्रोत तपासले जात होते. आता सर्व गावे, वाड्या-वस्त्यांवरीलही जलस्त्रोतांची तपासणी केली जाणार आहेत. जलसुरक्षक व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक यांच्यामार्फत ही तपासणी केली जात आहे. प्रत्येक तालुके, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे.

नदी, विहिरी, आड, कूपनलिका, झरे, पाणीपुरवठा योजना आदी जलस्त्रोतांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी मोबाईलवरील ॲप्लिकेशनचा वापर करून संबंधित ठिकाणी जलसुरक्षक, आरोग्यसेवक जातात. तेथे छायाचित्र काढून पोर्टलवर अपलोड करतात, तर पाण्याचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत पाठवतात. जेथे जलस्त्रोत आटले आहेत, अशा ठिकाणीही जावून त्याची छायाचित्रे घेणे, शिवाय ते जलस्त्रोत का आटले नाहीत, याची कारणे संबंधित कर्मचाऱ्याला द्यावी लागणार आहेत, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागातून देण्यात आली.

१४९० - ग्रामपंचायती
९३१० - जलस्रोत

Web Title: Water Sample Testing ZP