तापमानवाढीबरोबरच पाणीटंचाईही तीव्र

तापमानवाढीबरोबरच पाणीटंचाईही तीव्र

फलटण - फलटण तालुक्‍यात सध्या उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवसांत तापमान ३७.६ अंशावर पोचले आहे. एप्रिलच्या सुरवातीस पाणीटंचाईच्या झळा मर्यादित असल्या तरी आगामी काळात तापमान असेच राहिले तर संभाव्य टंचाईग्रस्त ४३ गावांपैकी काही ठिकाणी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, अशी स्थिती आहे. सध्या सहा गावे व ३१ वाड्या-वस्त्यांवर चार टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

सध्या धोम-बलकवडी कालव्याला पाण्याचे आवर्तन सुटल्याने दुष्काळी पट्ट्यातील पाझर तलाव भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे पाणी धुमाळवाडीपर्यंत आल्याने तालुक्‍याच्या दक्षिण पट्ट्यात दुष्काळाच्या झळा कमी प्रमाणात बसू लागल्याचे दिसते. तालुक्‍यातील १२७ गावांपैकी ५५ गावे टंचाई आराखड्यात समाविष्ट आहेत. त्यापैकी ५५ गावांनी पाण्यासंबंधीचे ग्रामसभेचे ठराव दाखल केलेत. २० गावांचे ठराव आलेले नाहीत. २९ गावांनी टंचाई आराखड्यात समाविष्ट करण्याची मागणी ग्रामसेभच्या ठरावाद्वारे केली आहे. त्यामुळे आजच्या स्थितीत कागदोपत्री ८४ गावे संभाव्य टंचाईग्रस्त आहेत. त्यापैकी ४३ गावे टंचाईग्रस्त घोषित झालीत. मिरढे, दुधेबावी, विंचुर्णी, वडले आणि शेरेशिंदेवाडी व नाईकबोमवाडी अशी सहा गावे व त्याखाली असलेल्या ३१ वाड्या-वस्त्यांवर चार टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणी टंचाईग्रस्तांची लोकसंख्या ८,११३ आहे. सध्या फलटण पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून टॅंकर भरून घेतले जात असले तरी आगामी काळात गिरवी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या फिडिंग पॉइंटवरून पाणी मिळू शकेल. वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाई  जाणवणार असल्याने शेरेशिंदेवाडी, ताथवडा व कापडगाव येथे विहिरी अधिग्रहणाचे प्रस्ताव सादर केले आहेत. पैकी ताथवडा येथील विंधन विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

‘रोहयो’वर ९५८ मजूर
तालुक्‍यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ३६ कामे सुरू असून त्यावर ९५८ मजूर कार्यरत आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून पाच कामांवर ४२० मजूर कार्यरत आहेत. त्यामध्ये मुंजवडी येथे गांडुळखत प्रकल्प, ढवळ व वाघोशी येथे नाडेप तसेच झिरपवाडी व विठ्ठलवाडी येथे शेततळ्यांची कामे सुरू आहेत. नाईकबोमवाडी व दुधेबावी येथे रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड व दालवडी, राजुरी येथे रोपवाटिका अशा ठिकाणी ४२ मजूर कार्यरत आहेत. वन विभागातर्फे उपळवे, ठाकुरकी, हिंगणगाव, निंबळक येथील रोपवाटिकांसाठी २१४ मजूर कार्यरत आहेत. 
 

टँकर सुरू केलेली गावे व कंसात लोकसंख्या
दुधेबावीसह आठ वस्त्या     (२,५९०)
मिरढे व सात वस्त्या     (२,०४१)
वडलेसह आठ वस्त्या     (९७५)
शेरेशिंदेवाडी व एक वस्ती    (७०)
नाईकबोमवाडीसह दोन वस्त्या     (७५६)
विंचुर्णी व पाच वस्त्या     (१०५१ )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com