आर. आर. आबांच्‍या गावात पाण्‍याचा ठणठणाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

तासगाव - राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्‍या आर. आर. आबांच्‍या गावात सध्‍या पाण्‍याचा प्रश्‍‍न सतावतो आहे. आबांचे गाव तासगाव तालुक्‍यातील अंजनी... तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण टंचाईची स्थिती आहे.  

तासगाव - राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्‍या आर. आर. आबांच्‍या गावात सध्‍या पाण्‍याचा प्रश्‍‍न सतावतो आहे. आबांचे गाव तासगाव तालुक्‍यातील अंजनी... तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण टंचाईची स्थिती आहे.  

अंजनी तलावाखाली पाणी योजना पूर्णपणे बंद आहेत. या गावासह पाच गावांच्या पाणी योजना बंद असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. अंजनी तलावात पाणी नसल्याचा फटका अंजनी, डोंगरसोनी, वडगाव, नागेवाडीला बसत आहे.
आर. आर. आबा पाटील यांच्यानंतर गावाची पाण्याबाबतीत आबाळ होणे ही शोकांतिकाच म्‍हटली पाहिजे.

आबांचे एकेकाळचे विरोधक संजय पाटील हे आता खासदार आहेत. या तालुक्‍यातील राजकीय चित्र बदलले आहे. पण या परिस्‍थितीचा फटका आता अंजनी गावालाही बसला आहे. अंजनी येथे वीस दिवस पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. तलावातून गावाला पाणीपुरवठा होतो. मात्र तिथे पाणीच नसल्याने योजना बंद आहे. 

काही कूपनलिका, विहिरींतून होणारा पाणीपुरवठाही बंद  झाल्याने ग्रामपंचायत दोन टॅंकरने पाणी पुरवण्याचा प्रयत्न करीत आहे. तहसीलदारांना पत्र देऊन ग्रामपंचायतीने  टॅंकर सुरू करण्याची मागणी केली आहे. जिल्हा ‘टॅंकरमुक्‍त’ असल्याने टॅंकर देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे.

दरम्यान, अंजनीतील ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन घागर मोर्चाचा इशारा दिला आहे. अशीच स्थिती डोंगरसोनी, वडगाव, नागेवाडी येथेही  आहे. अंजनी तलावात पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याच्या योजना ठप्प आहेत. 

Web Title: water scarcity in Anjani Tasgaon Taluka