गडहिंग्लज शहरासह परिसरात पाणी कपातीची वेळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

एक नजर

  • हिरण्यकेशी नदीपात्रात पाणी नसल्याने गडहिंग्लज शहर व बड्याचीवाडी हद्दीत आजपासून 15 मिनिटे पाणी कपात.
  • गडहिंग्लज पालिकेचा निर्णय. 
  • चार वर्षानंतर पाणी कपात करण्याची पालिकेवर वेळ. 

गडहिंग्लज - हिरण्यकेशी नदीपात्रात पाणी नसल्याने गडहिंग्लज शहर व बड्याचीवाडी हद्दीत आजपासून 15 मिनिटे पाणी कपातीचा निर्णय पालिकेने जाहीर केला आहे. चार वर्षानंतर पाणी कपात करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. चार वर्षापूर्वी एकदा एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला होता. 

चित्री प्रकल्पातील पाणी हिरण्यकेशी नदीत सोडले जाते. नदीवरील गिजवणे बंधाऱ्याजवळ गडहिंग्लजच्या पाणी योजनेची जॅकवेल आहे. तेथूनच शहर व परिसरात पाणीपुरवठा होतो. 29 एप्रिल रोजी चित्री प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले. परंतु, उपसा अधिक झाल्याने अवघ्या काही दिवसात नदीपात्रातील पाणी संपून पात्र कोरडे पडले. परिणामी नदीवर अवलंबून असलेल्या सर्वच पाणी योजनांचे जॅकवेलमधील पाण्यानेही तळ गाठला. गिजवणे बंधाऱ्यात काही अंशी पाणीसाठा शिल्लक आहे.

चित्री प्रकल्पातून सोडलेले पाणी येईपर्यंत या उपलब्ध साठ्यावर गडहिंग्लजचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा लागणार आहे. 
दरम्यान, नगराध्यक्षा स्वाती कोरी व मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी बंधाऱ्याला भेट देवून पाहणी केली. पाण्याची उपलब्धतता पाहून तातडीने शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळात कपात केली. रोज एक तास पाणीपुरवठा केला जात होता. आता यामध्ये 15 मिनिटांची कपात करून आता पाऊण तासच पाणीपुरवठा होणार आहे.

सध्या शहरात मीटरने पाणीपुरवठा सुरू असला तरी अद्यापी रोज 65 लाख लिटरची गरज शहराला असते. एकीकडे पाण्याची उपलब्धतता कमी आणि मागणी अधिक अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. आता नागरिकांनीही पाण्याची काटकसर करण्याची गरज आहे. चित्रीमध्ये सोडण्यात येणारे पाणी जुलैपर्यंत पुरवावे लागणार असल्याने पाणी वापरात मोठ्या प्रमाणात काटकसर गरजेची आहे. नागरिकांनीही पाणी बचत करून सहकार्य करण्याचे आवाहनही पालिकेने केले आहे. 

चार वर्षापूर्वी अशीच पाणीबाणीची अवस्था निर्माण झाली होती. त्यावेळी पालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पहिल्यांदाच पाणी पुरवठ्याच्या वेळेत कपात करण्याची वेळ आली आहे. पाटबंधारे खात्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केल्याने ही परिस्थिती ओढवली असून साऱ्यांवरच पाणीबाणीचे संकट कोसळले आहे. या मानवी टंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेवून पाणी बचतीची सवय लावून घेणे गरजेचे आहे. 

Web Title: Water scarcity in Gadhinglaj city