पाऊस सुपानं मात्र उन्हाळ्यात ठणठणाट 

शिवाजी यादव
गुरुवार, 11 एप्रिल 2019

डोंगरी भागातील तब्बल 12 वाड्या वस्त्यावर पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शाहूवाडीच्या पश्‍चिम भागात ही स्थिती आहे. 

कोल्हापूर - वनसंपदेने बहरलेल्या पश्‍चिम घाटात डोंगर, दऱ्या खोऱ्यातून नाल्याचे झऱ्यांचे पाणी वाहते. पावसाळ्यात येथे सुपानं पाऊस पडतो मात्र, उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा येथील भूमिपुत्र वर्षानुवर्षे सोसतो आहे. सुरू झालेल्या कडक उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडत आहे. डोंगरी भागातील तब्बल 12 वाड्या वस्त्यावर पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शाहूवाडीच्या पश्‍चिम भागात ही स्थिती आहे. 

शाहूवाडी तालुक्‍यातील भाततळी, पांढरेपाणी, मठ गजापूर, कुंभुर्णेवाडी, येळवण जुगाई पैकी धनगरवाडा, मानपैकी धनगरवाडा, चिखलवाडा, या भागात सध्या पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. जिल्हा परिषद नियोजन मंडळाच्या निधीतून गावागावांत, वाडीवस्तीवर नळ-पुरवठा योजना झाल्या आहेत. काही गावात पाण्याच्या टाक्‍या बांधल्या आहेत. त्यातून बारमाही पाणीपुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करते. मात्र शाहूवाडी तालुक्‍यातील मांजरे ते या मार्गालगत भाततळी, चिखलवाडी या भागात पाण्याची कमतरता जाणवते. या परिसरात घनदाट जंगल आहे. डोंगर दऱ्यात झरे आहेत. वस्तीपासून किमान तीन ते चार किलोमीटरवर हे झरे आहे. त्यामध्ये खड्डे खोदून किंवा बांध घालून झऱ्याचे पाणी साठवले. त्यात नळ सोडून नळाव्दारे वाडी वस्तीवर आणले आहे. 

भाततळी येथे तरी अंगणवाडी शेजारी पाण्याची टाकी रिकामी असते. अंगणवाडीसमोर शंभर फुटावर नळ आहे. त्या नळाला सध्या पाणी आहे. हे पाणी पावनखिंडी परिसरातील झऱ्यावरून आणल्याचे ग्रामस्त सांगतात. हे पाणी अजून पंधरा ते वीस दिवस पुरेल एवढेच आहे, या कालावधीत पाऊस झाला नाही तर पाण्याची टंचाई जाणवणार आहे. तर रोजच्या वापरासाठी आणि पिण्यासाठी आणावे कसे? असा प्रश्‍न ग्रामस्थांचा आहे. 

उन्हाळ्यात पाणीटंचाई ठळक होईल, तसा त्याचा फटका बांधकामांना होतो. ज्यांचे घराचे बांधकाम सुरू असते, अशी बांधकामे पाण्याअभावी थांबवावी लागत आहेत. तर पिण्याच्या पाण्याची गरज कशीबशी भागवली जाते, पण जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न येतो. तर ज्यांच्या घरात लग्नकार्य किंवा तत्सम काही घरगुती कार्यक्रम असेल तर तालुक्‍याच्या ठिकाणाहून पाण्याचा खासगी टॅंकर मागवावा लागतो, अशी स्थिती आहे. 

""शाहूवाडीच्या पश्‍चिम भागात जंगल आहे. पूर्व भागात जी गावे आहेत, तिथे पाण्याची सोय आहे. जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतींनी नळाची सुविधा असल्याने पाणीपुरवठा नागरी भागात होतो. पण टंचाईच्या झळा धनगरवाड्यांना सोसाव्या लागतात. 12 ते 15 हून अधिक धनगरवाड्यांना पाणीटंचाई जाणवते. येथे कायमस्वरूपी पाण्याच्या टाक्‍या बसविल्या पाहिजेत. नदीतून पाण्याची व्यवस्था करावी लागेल'' 
-हरिष कांबळे, शाहूवाडी. 

दृष्टिक्षेपात 
* शाहूवाडी पश्‍चिम भागात 12 धनगवाडे, 
* एका वाडीवर प्रत्येकी लोकसंख्या 250 ते 500 
* जनावरे 120 ते 200 

Web Title: Water scarcity in kolhapur