आटपाडी परिसरातली माणदेशी माणसं भिडली दुष्काळाला!

शीतल मासाळ
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

जगणं लाईव्ह!
प्रत्येक बातमीच्या मागे असते एक बातमी, एक कहाणी. जी सांगत असते, माणसांच्या सुख-दु:खाच्या गोष्टी. या गोष्टी असतात, अनुभवाचे बोल सांगणाऱ्या, जगण्याच्या लढाईसाठी बळ देणाऱ्या. बातम्यांच्या गर्दीत हरवलेल्या या कहाण्या आमच्या बातमीदारांनी शोधल्या. यंदाच्या दिवाळी विशेषांकात या ‘लाईव्ह’ कहाण्या ‘रिपोर्ताज’ स्वरूपात सविस्तरपणे मांडल्या जातीलच; पण त्यापूर्वी त्यातील काही ‘जगण्याच्या लढाया’ आम्ही बातम्यांच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. अर्थात, ही आहे एक झलक. खरी मेजवानी मिळेल, ‘सकाळ दिवाळी २०१८’च्या विशेषांकातून...

पाऊसपाणी रुसला, दुष्काळाचा घाला आला, की माणसं कोलमडतात. आत्महत्येचा विचार करू लागतात; पण दुष्काळ पाचवीला पुजूनही सांगलीतील आटपाडी परिसरातली माणदेशी माणसं माळावरच्या बाभळीप्रमाणं मातीत पाय घट्ट रोवून उभी आहेत. त्यांच्या या उभं राहण्याचं एक रहस्य ‘सकाळ’ला उलगडलं. ते म्हणजे, कठीण परिस्थितीत एकमेकांना मदत करणं! ही दुर्मिळ माणुसकी पाहायला मिळाली जांभुळणी गावात. मुलीच्या लग्नात कर्जबाजारी होऊन कफल्लक झालेल्या मेंढपाळाला गावकऱ्यांनी एकेक मेंढरू दिलं आणि हा माणूस उमेदीनं उभा राहिला. त्याची ही गोष्ट...

जांभुळणीतील मेंढपाळ जगन्नाथ माने मुलींच्या लग्नापायी कर्जबाजारी झाले. त्यांना घरदार विकावे लागले. ते बेघर झाले. उघड्यावरच आले. पण, गावाची परंपरा माणुसकीची. एक दिवस गावकरी एकत्र जमले. प्रत्येकानं एकेक कोकरू दिलं आणि जमा झाला २० मेंढ्यांचा कळप! जगन्नाथचं जगणं पुन्हा नव्यानं सुरू झालं... 

बेघर, कर्जबाजारी झालेल्या माणसाला त्याच्या पायावर खंबीरपणे उभं करण्याची जांभुळणीची परंपरा जुनीच आहे. गावात एखादा माणूस आर्थिक अडचणीत सापडला, की त्याला घरटी एक कोकरू भंडारा टाकून दिलं जातं. यातून त्या माणसाला २० ते २५ कोकरं मिळतात अन्‌ त्याचा कळप तयार होतो. यातून तो पुन्हा उभा राहतो. जांभुळणीची लोकसंख्या सुमारे १७०० ते १८००. परिसरात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे शेळी-मेंढीपालन हाच गावचा मुख्य व्यवसाय आहे. गावात सर्व जातींचे लोक राहतात. त्यातही धनगर समाज मोठा आहे. घराघरांत मेंढरांचा खांड पाहायला मिळतो. 

तीन वर्षांपूर्वी गावातील जगन्नाथ माने हे रामाेशी आपल्या दोन मुलींच्या लग्नासाठी कर्जबाजारी झाले. त्यांना घरदार विकावे लागले. त्यांना उभारी देण्यासाठी गावातल्या लोकांनी कंबर कसली. परंपरेप्रमाणे त्यांनाही मेंढरांची २० पिले देण्यात आली. आज त्यांच्या ४० मेंढ्या झाल्या आहेत. हंगामात ऊसतोडीला कामगार म्हणून जाणाऱ्या जगन्नाथ यांनी मेंढ्यांच्या माध्यमातून मुलींच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाची ५० टक्के रक्कम फेडली आहे. बापू थिटे यांनाही गावाने दहा वर्षांपूर्वी मेंढ्या देऊन उभे केले होते.  त्यांचा आता ८० मेंढ्यांचा कळप झाला आहे. ही परंपरा गावात आजही सुरू आहे. 

गावातले सामाजिक कार्यकर्ते शिवराम मासाळ याबाबत म्हणाले, की पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अशा लोककल्याणकारी गोष्टी सुरू केल्या. यातून धनगर समाजाला बळ मिळत आहे आणि तो दुष्काळातही तगून राहतो आहे.

परंपरा काय आहे?
कोकरावर भंडारा टाकून दोन साक्षीदारांसमोर ते कोकरू नारळासह संबंधित इसमाला दिले जाते. एकदा भंडारा-नारळ टाकला, की ती मेंढी विकायची नाही, असा नियम आहे. अशी शेळी-मेंढी कापूनही खायची नाही, असेही बजावले जाते. फक्त कळप वाढवत न्यायचा. एका मेंढीपासून तयार होणारी मेंढरे हेच त्या मेंढपाळाचे जगण्याचे आणि उत्पन्नाचे साधन बनते. त्यातून तो आपले कर्ज फेडतो. 

आमच्या गावासह शेजारच्या गावांनी मला उभं केलंय. मोठ्ठं उपकार हायती. आता माझं सगळं चांगलं झालंय. म्या बी अडचणीच्या वेळी गावं कंदीबी हाक मारली, की रातचंही उभा असतुया. गाव लग्न समारंभाला बाहेर गेलं की सगळ्या गावाची राखण माझ्याकडंच असत्या.
- जगन्नाथ माने,
मेंढपाळ

Web Title: water Scarcity in Mandesh Sangli District