हंडाभर पाण्यासाठी वणवण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

दरवर्षी टंचाई म्हणून आमची वस्ती घोषित होते. परंतु, शासनाकडून कुठलीच सोय होत नाही. अजून महिनाभर तरी पाऊस होणार नसल्यामुळे पाण्याअभावी पशुधन धोक्‍यात आले आहे. आमच्या प्रश्नांकडे कोणी लक्ष देणार की नाही? 
- ज्ञानेश्वर आखाडे, ग्रामस्थ, आखाडे वस्ती

कास - सदाहरीत व अतिवृष्टीच्या कास पठाराच्या कुशीत वसलेल्या मौजे कुसुंबीमुरा येथील आखाडे वस्तीवर गेल्या महिनाभरापासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करून डोंगरदऱ्यातील झऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. 

कुसुंबीमुरा हे कास पठाराच्या पश्‍चिमेला वसलेले गाव आहे. गावाच्या वरच्या बाजूला कास पठाराला लागूनच आखाडे वस्ती आहे. वस्तीत १५ ते २० घरे असून, गावात पाण्याची टाकी बांधलेली आहे. या टाकीत पठाराच्या कडेला असणारे झऱ्याचे पाणी सोडलेले आहे. परंतु, भीषण उन्हाळ्यात सर्व झरे आटले आहेत. त्यामुळे त्यातील पाणी टाकीत येणे बंद होवून महिना झाला. 

महिनाभरापासून लोकांना खडकाच्या कपारीतील झरे शोधून त्यातून डोंगरदऱ्यातील वाटा तुडवत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पाण्याच्या कसरतीपायी दुसरे कामही होत नसल्याने रात्रंदिवस पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. 

काही दिवसांपूर्वी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी येथील परिस्थितीची पाहणी करून टॅंकर अथवा इतर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. पण, प्रशासनाने डोळेझाक चालवली आहे. माणसांबरोबरच जनावरांचेही हाल होत आहेत.

Web Title: Water Shortage Drought Akhade vasti