पाणी आलं कमी, रब्बीची काय हमी?

संजय जगताप
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

खटाव व माणमधील तलाव, बंधारे कोरडे पडू लागले; पाण्याअभावी पिके कोमेजली

मायणी - पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. परतीच्या पावसानेही पाठ फिरवली. पाऊस- पाण्याअभावी खटाव व माणमधील तलाव, बंधारे, ओढे-नाले कोरडे पडू लागलेत. विंधन विहिरींचे पाणी कमी येऊ लागले आहे. पाण्याअभावी ठिकठिकाणची पिके कोमेजू लागलीत. त्यामुळे पिके हाती लागतील, याची हमी नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडू लागली आहे. 

खटाव व माणमधील तलाव, बंधारे कोरडे पडू लागले; पाण्याअभावी पिके कोमेजली

मायणी - पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. परतीच्या पावसानेही पाठ फिरवली. पाऊस- पाण्याअभावी खटाव व माणमधील तलाव, बंधारे, ओढे-नाले कोरडे पडू लागलेत. विंधन विहिरींचे पाणी कमी येऊ लागले आहे. पाण्याअभावी ठिकठिकाणची पिके कोमेजू लागलीत. त्यामुळे पिके हाती लागतील, याची हमी नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडू लागली आहे. 

खटावचा पूर्व व पूर्व-दक्षिण भाग आणि माणच्या दक्षिण पट्ट्यात पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. यंदा त्या भागात पुरेसा पाऊस झाला नाही. परतीचा हमखास पडणारा पाऊसही गुंगारा देऊन निघून गेला. त्यामुळे खटाव व माणमधील अनेक तलाव, बंधारे, ओढे-नाले, विहिरी कोरड्या पइू लागल्या आहेत. तर विंधन विहिरींचे पाणी कमी आले आहे. त्याही फारवेळ चालत नाहीत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ होऊ लागला आहे. 

पाणी कमी आल्याने रब्बीतील ज्वारी, हरभरा, गहू आदी महत्त्वाच्या पिकांना पाणी कुठून द्यायचे, असा यक्ष प्रश्न सद्या शेतकऱ्यांना सतावत आहे. पिके सद्या ऐन बहरात आहेत. काही ठिकाणच्या ज्वारीचे पीक पोटऱ्यात आले आहे. तर काही ठिकाणी कणसे बाहेर पडली असून त्यामध्ये दाणे भरू लागले आहेत. अशावेळी पिकांना पाण्याची आवश्‍यकता असते.

मात्र, पाण्याची गरज असतानाच ऐनवेळी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. तो दूर करण्यासाठी शेतकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एका विहिरीतील पाणी दुसऱ्या विहिरीत आणण्यासाठी नियोजन कऱण्यात येत आहे. त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या जलवाहिन्यांची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ होताना दृष्टीस येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी ठिकठिकाणी विंधन विहिरी घेतल्या आहेत. त्याद्वारे शेततळ्यात पाणी साठवून ते पाणी पिकांना देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, ‘पाणी आडातच नाही तर पोहऱ्यात कुठुन येणार,’ अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे शेततळीही कोरडी आहेत. पाण्याअभावी पिके सुकून जाऊ लागली आहेत.

सुकलेली पिके बघून शेतकऱ्यांच्या आतड्यांना पिळ पडत आहे. त्यामुळे पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काही शेतकरी नव्याने विंधन विहिरी घेऊ लागले आहेत. मात्र, भूजल पातळी खालावल्याने ५०० फुटांपर्यंतही विंधन विहिरींना पाणी लागत नसल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम हाती लागणार का, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. ठिकठिकाणचे शेतकरी सिंचन योजनांचे पाणी देण्याची मागणी करीत आहेत. येरळवाडी तलावातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, वेळेत पाणी मिळते की नाही, या शंकेने शेतकरी हतबल झाले आहेत. पिकांना पाणी उपलब्ध करण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली आहे. त्यातच पूर्ण वेळ शेतीपंपांना वीज मिळत नसल्याच्या तक्रारीही शेतकरी करीत आहेत.

Web Title: water shortage effect on agriculture