हंडाभर पाण्यासाठी मैलभर पायपीट!

Water-Supply
Water-Supply

दहिवडी - माण तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. पाण्यावाचून जनावरांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गावोगावचे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. विहिरी कोरड्या पडल्या अन्‌ बोअरवेलनी तळ गाठला आहे. हंडाभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे. मात्र, प्रशासन अजूनही कागदी घोडे  नाचवत असून, सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

दहिवडी नगरपंचायतीच्या वतीने दोन टॅंकरने होणारा पाणीपुरवठा नागरिकांना कितपत पुरतो, याची जाणीव नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना असल्याचे दिसत नाही. त्यातच पिण्याच्या पाण्याचे टॅंकर दहा-दहा, १५-१५ दिवस वाड्यावस्त्यांवर फिरकत नसल्याने नागरिक व शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. माणसांना पाणी मिळत नाही तर जनावरांचे करायचे काय,? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

नगरपंचायतीपेक्षा ग्रामपंचायत बरी होती, अशी स्पष्ट प्रतिक्रिया नागरिकांसह नगरसेवकदेखील आता बोलून दाखवू लागले आहेत. १५ हजार लोकसंख्या व तालुक्‍याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या शहरातच एवढा मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण होत असेल तर प्रशासन व लोकप्रतिनिधी करतात काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

तालुक्‍याचे मुख्यालय असलेल्या दहिवडीच्या पाणीपुरवठा योजनेची आंधळी विहीर पूर्णपणे आटून गेली आहे. त्यामुळे वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा करणारे दोन्ही टॅंकरदेखील दहिवडी प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या टाकीमध्ये पाणी सोडत असल्यामुळे वाड्यावस्त्यांवर हाल होताना दिसत आहेत. ‘ना शहराला पुरेसे पाणी, ना वाड्यावस्त्यांत’ त्यामुळे शहरातील ग्रामस्थांनादेखील आठ ते दहा दिवस नळाला पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे दिसत आहे. 

दहिवडी नगरपपंचायत कार्यक्षेत्रात टंचाईच्या काळामध्ये तरी पाणीपुरवठा वेळेत व्हावा. अंतर्गत राजकारणाचा शेतकरी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुख्याधिकाऱ्यांनी पाणीप्रश्नी लक्ष घालून टॅंकरसंख्या वाढवावी, अन्यथा नगरपंचायतीला टाळे ठोकू.
- अशोक जाधव, संचालक, दहिवडी सेवा सोसायटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com