पावसाचे आगर असूनही घशाला कोरड!

पावसाचे आगर असूनही घशाला कोरड!

भिलार - महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या आणि महाराष्ट्राला वीज पुरवणारे कोयना धरण उशाशी असणाऱ्या महाबळेश्‍वर तालुक्‍यातही पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांना अक्षरशः वणवण भटकण्याची वेळ आली आहे. तालुक्‍यातील महाबळेश्‍वर आणि पाचगणी या मुख्य पर्यटनस्थळांसह अनेक गावांत पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

तालुक्‍यातील ५५ गावे आणि २७ वाड्या टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. असे असले तरी दिवसेंदिवस उन्हाळाच्या झळा तीव्र होत असल्यामुळे आणखी गावांची त्यात भर पडणार आहे. पाणीटंचाई तीव्र होत असल्याने गावोगावी पाण्यासाठी वादावादी होऊ लागली आहे. भिलारमध्ये पाण्यासाठी महिलांना मोर्चा काढावा लागला. एकट्या भिलारमध्ये बोअरची संख्या मोठी असूनही महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. एप्रील ते मेच्या दरम्यान असणाऱ्या बोअरवेलच्या पाण्याची पातळीही खालावत आहे. त्यामुळे पाणीटंचाई तीव्र होते आहे. भिलारच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांमध्ये नसलेल्या समन्वयाअभावी गावाला टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महाबळेश्‍वर तालुका इको सेन्सिटिव्ह झोनध्ये येत असल्याने या ठिकाणी विहिरी व बोअर खोदण्यास मनाई आहे, असे असले तरी बोअरची संख्या वाढत आहे. त्याचा परिणाम सार्वजनिक पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत, ही वस्तुस्थिती असताना महसूल विभाग आणि पंचायत समिती प्रशासनाने यावर विचार करणे गरजेचे आहे. 

तालुक्‍यात पाचगणी व महाबळेश्‍वर ही दोन पर्यटनस्थळे येतात. या दोन्ही शहरांची लोकसंख्या २८ हजार २८७ आहे. या दोन शहरांना वेण्णालेकमधून पिण्याचे पाणी पुरवले जाते. परंतु, वेण्णालेकच्या पाण्याची पातळी खालावल्याने या दोन्ही शहरांना मार्चपासूनच टंचाई भासत आहे. दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने या दोन्ही शहरांमध्येही पाण्याचा ठणठणाट सुरू आहे. पाचगणीला येणाऱ्या पाण्यातून तायघाट या गावाला पाणीपुरवठा आहे. परंतु, त्याही गावाला पाण्यासाठी टॅंकरची आवश्‍यकता भासत आहे. यावरून या दोन्ही शहरांनाही टंचाईने ग्रासले आहे. बोअरवेलचे प्रस्ताव आलेल्या गावांमध्ये भूजल सर्वेक्षण सुरू असून, या गावांत तातडीने बोअरवेल काढण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकाऱ्यांनी दिली.

राजपुरी, तायघाटला टॅंकर सुरू, तीन गावांचे प्रस्ताव
तालुक्‍यातील राजपुरी व तायघाट या दोन गावांना टॅंकरद्वारा पाणी सुरू आहे. तर कुरोशी, आचली व खिंगर या तीन गावांनी टॅंकरची मागणी केलेली आहे. टंचाईग्रस्त गावांमधील माचुतर, गावढोशी, वाळणे, रामेघर, वारसोळी, देवळी, तळेमाळ, दाभेमोहन व भिलार या आठ गावांना पिण्याच्या पाण्याची अधिक टंचाई भासत असल्याने त्यांचे हातपंपाचे (बोअरवेल) प्रस्ताव आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com