जीव गेल्यावर टॅंकर सुरू करणार का?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मायणी - खटाव व माणमधील अनेक गावे तहानेने व्याकुळ असताना प्रशासन मात्र वेळकाढूपणा करीत आहे. टंचाई जाहीर झाली नसल्याचे तुणतुणे वाजवणारे अधिकारी आता टंचाईच्या प्रस्तावात त्रुटी काढून टॅंकर सुरू करण्यास चालढकल करीत आहेत. असंवेदनशील प्रशासनाविरुद्ध नागरिकांतून संताप व्यक्त केला जात असून जीव गेल्यावर टॅंकर सुरू करणार का? असा संतप्त सवाल केला जात आहे. 

यंदा खटाव व माणमधील सुमारे ७० ते ८० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संबंधित गावांनी टॅंकर सुरू होण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केलेत. मात्र, दोन महिन्यांपासून ते शासन दरबारी धूळ खात पडलेत. टंचाई जाहीर झाली नसल्याचे तुणतुणे वाजवत अधिकाऱ्यांनी टंचाईकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेले दिसते. पाणी टंचाईबाबत ‘सकाळ’मध्ये वारंवार वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर प्रशासनाने खटावमधील ४० व माणमधील ३१ गावांत टंचाई जाहीर केली. मात्र, टंचाई जाहीर करून सुमारे तीन आठवड्यानंतरही टॅंकर सुरू झालेले नाहीत. 

प्रस्तावातील त्रुटी काढून पुन्हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश 
दिले जात आहेत. पाण्यासाठी आबालवृद्ध दाही दिशा फिरत 
आहेत. त्यामध्ये एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे का? असा संतप्त सवाल केला जात आहे. 

दरम्यान, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून लोक शहरी भागात स्थलांतरित होऊ लागलेत. काही दिवसांपूर्वी खासगी टॅंकरने उपलब्ध होणारे पाणी आता दुप्पट पैसे मोजूनही मिळेनासे झाले आहे.

टॅंकर सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला, पाठपुरावा केला. आधी टंचाई जाहीर नसल्याचे सांगितले गेले. आता प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगून चालढकल केली जात आहे. तातडीने टॅंकर सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. 
- मेघा पुकळे, सदस्या, पंचायत समिती, खटाव 

Web Title: water shortage water tanker