जलस्रोतांचे रूपांतर कचराकुंड्यांत!

शैलेन्द्र पाटील
बुधवार, 18 एप्रिल 2018

सातारा - हत्ती तलाव, रिसालदाराचे तळे, श्रीपतरावांचे तळे, इमामपुरा तळे, साखर तळे, नाईकीनीची विहीर, बाजीरावची विहीर, बदामी विहीर, खारी विहीर ... साताऱ्यातील काही ज्येष्ठांच्या तोंडून कानावर आलेली तलाव व विहिरींची ही व अशी नावे इतिहासजमा होत आहेत. आजही या ऐतिहासिक पाऊलखुणा जुन्या शाहूनगराची व पाण्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण व समृद्ध साताऱ्याची साक्ष देतात. या पाऊलखुणा जपण्याऐवजी आज आपण त्यांच्या कचराकुंड्या करून टाकल्या आहेत. या ऐतिहासिक वास्तूंतील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त करण्याची साद घालत आहेत. 

सातारा - हत्ती तलाव, रिसालदाराचे तळे, श्रीपतरावांचे तळे, इमामपुरा तळे, साखर तळे, नाईकीनीची विहीर, बाजीरावची विहीर, बदामी विहीर, खारी विहीर ... साताऱ्यातील काही ज्येष्ठांच्या तोंडून कानावर आलेली तलाव व विहिरींची ही व अशी नावे इतिहासजमा होत आहेत. आजही या ऐतिहासिक पाऊलखुणा जुन्या शाहूनगराची व पाण्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण व समृद्ध साताऱ्याची साक्ष देतात. या पाऊलखुणा जपण्याऐवजी आज आपण त्यांच्या कचराकुंड्या करून टाकल्या आहेत. या ऐतिहासिक वास्तूंतील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त करण्याची साद घालत आहेत. 

मराठ्यांच्या अखेरच्या राजधानीची ओळख श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने असली तरी हे शहर अत्यंत कौशल्याने व नियोजनपूर्वक वसवले श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी. यवतेश्‍वर मंदिरामागे तलाव बांधून त्याचे पाणी नैसर्गिक उताराने साताऱ्यात आणले. त्याच्या वितरणासाठी कमानी हौद, पंचपाळे हौद, छत्री हौद तसेच पाण्याच्या डब्या आदी व्यवस्था करण्यात आली. जागतिक वारसादिनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील इतिहास अभ्यासक नीलेश पंडित यांनी ‘सकाळ’ला काही जलस्त्रोतांच्या जुन्या नावांची माहिती दिली.

इमामपुरा तळे ! 
वाढत्या शहराची गरज पूर्ण करण्यासाठी थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी अनेक सुधारणा घडवल्या. एक लाख रुपये खर्च करून त्यांनी १८२९ मध्ये महादरे तलाव बांधला. त्याच्यावरच्या बाजूस असलेल्या तळ्यात महाराजांचा हत्ती पाणी पित असे त्यामुळे त्याला हत्ती तळे नाव पडले. फुटक्‍या तळ्याच्या परिसरास ‘इमामपुरा’ नावाची वस्ती होती. त्यावरून त्याला ‘इमामपुरा तळे’  असे संबोधण्यात येत असे. नंतर ‘फुटके तळे’ हे नाव रुढ झाले. या तळ्यात पूर्वी फारसे पाणी नसायचे. कास पाटाने शहरात पाणी येऊ लागल्यानंतर या तळ्याचा झिरप वाढल्याचे दाखले मिळतात.

मोती तळे व बाजीरावची विहीर
प्रतापसिंह महाराजांनंतर गादीवर आलेल्या अप्पासाहेबांनी जुन्या पालिकेनजीक पाण्याची सोय म्हणून तळे बांधले. रेशीम धुण्यासाठी व्यावसायिक या ठिकाणी येत. या तळ्यातील पाण्यामुळे रेश्‍माला मोत्यासारखी चकाकी यायची. त्यावरून त्याला ‘मोती तळे’ नाव पडले. लिंबच्या बारामोटेच्या विहिरीची आठवण करून देणारी भव्य दगडी विहीर शुक्रवार पेठेत आहे. थोरल्या बाजीरावांनी ही विहीर बांधल्याने तिला ‘बाजीरावांची विहीर’ म्हणतात. परिसराला बाजीराव पेठ म्हणत. नंतरच्या काळात ही पेठ शुक्रवार पेठेत समाविष्ट झाल्याची वदंता आहे.

रिसालदाराचे तळे
मल्हार पेठेत पोलिस मुख्यालयाजवळ प्रतापसिंह महाराज यांच्या घोड्यांची पागा होती. या घोड्यांची देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यास रिसालदार म्हणत. दौलत खान नावाच्या रिसालदाराने घोड्यांच्या व्यवस्थेसाठी दगडी बांधकामात मोठे तळे बांधले. तसा शिलालेख आहे. पोलिस प्रशासनाने जीर्णोद्धार केल्याने आजही या तळ्याचे पाणी वापरात आहे. १८४४ च्या सुमारास नव्या राजवाड्याच्या बांधकामासाठी मंगळवार पेठेत खोदकाम करून दगड काढण्यात आले. त्या खड्याच्या ठिकाणी औंधच्या पंतप्रतिनिधींनी आखीव-रेखीव तळे बांधले. पेठेच्या नावावरून ‘मंगळवार तळे’ हे नाव रुढ झाले, असे असले तरी पूर्वी त्याला ‘पंतांचे’ अथवा ‘श्रीपतरावांचे तळे’ म्हणत. 

साखर तळे 
जुन्या मोटार स्टॅंडवर, बुधवार पेठेच्या बाजूस एक तळे आहे. या जुन्या वाहनतळावर आलेला एक साखरेचा ट्रक गाडी मागे घेत असताना संरक्षक कट्टा नसलेल्या तळ्यात कोसळला. ट्रकभर साखर तळ्यात विरघळल्याने या तळ्याला पुढे ‘साखर तळे’ संबोधण्यात येऊ लागले. ५० दशकांत घडलेली ही दुर्घटना आजही ज्येष्ठांच्या स्मृतीत आहे. कॅम्प भागातील लष्करी  छावणीसाठी प्रतापसिंह महाराज यांच्या काळात गोडोलीत तलाव बांधण्यात आला. हाच आता ‘गोडोली तळे’ नावे ओळखला जातो. अति क्षारयुक्त पाण्यामुळे विहिरीचे पाणी खारट लागायचे, त्यामुळे मंगळवार पेठेतील विहिरीस ‘खारी विहीर’ नाव पडले, अशा आठवणी ज्येष्ठ मंडळी सांगतात. 
फुटके तळे, रिसालदाराचे तळे अशी मोजकी उदाहरणे सोडली तर उर्वरित वास्तूंची कचराकुंडीसारखी अवस्था आहे. मोती तळे हे नावालाच शिल्लक आहे. मंगळवार तळे त्याच मार्गावर आहे. साखर तळे जलपर्णीने बुजले आहे. त्याच्या भोवती पडलेले कचऱ्याचे कोंडाळे दुर्लक्षाची साक्ष देते. पाण्याचे हौद अतिक्रमणांनी वेढले आहेत. ऐतिहासिक काळातील हे जलस्त्रोत जपण्याची गरज आहे.

Web Title: water source garbage bin lake water pollution