कासमध्ये वाढणार पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

गाळ काढल्‍याचा परिणाम; अडीच कोटी लिटर जादा पाणी

सातारा - जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागातर्फे कास तलावातील गाळ काढण्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. पावसाळ्यापूर्वी २५ ते ३० हजार घनमीटर गाळ काढण्यात येईल. या कामामुळे सुमारे अडीच कोटी लिटर जादा पाणीसाठा तलावात होणार आहे.

गाळ काढल्‍याचा परिणाम; अडीच कोटी लिटर जादा पाणी

सातारा - जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागातर्फे कास तलावातील गाळ काढण्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. पावसाळ्यापूर्वी २५ ते ३० हजार घनमीटर गाळ काढण्यात येईल. या कामामुळे सुमारे अडीच कोटी लिटर जादा पाणीसाठा तलावात होणार आहे.

जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या या तलावाला १२५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. या तलावातील पाण्याचा वापर हा सातारा शहर व १६ गावांची तहान भागविण्यासाठी होतो. डोंगर उताराच्या, खोलगट भागात या तलावाची निर्मिती झाली असल्याने पावसाच्या पाण्याबरोबर तलावात मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येतो. पिण्याचे पाणी म्हणून तलावाचा उपयोग होत असल्याने तलावातील पाणी सोडून देऊन गाळ काढणे शक्‍य होणार नाही.

उन्हाळ्यात पाणीसाठा कमी झाल्याने तलावाचा बराचसा भाग उघडा पडतो. त्यामुळे त्या भागातील गाळ काढणे शक्‍य होते. हे लक्षात घेऊन राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या पुढाकाराने गेल्या काही वर्षांपासून पालिकेने तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. उन्हाळ्यात पाणीपातळी कमी झाल्यानंतर पाटबंधारे विभागाचा यांत्रिकी विभाग या कामी मदत करत आहे. गेल्या आठवड्यात तलावातील गाळ काढण्याच्या कामास सुरवात झाली. एक जेसीबी, एक पोकलेन, सहा डंपरच्या साह्याने गाळ काढून बाहेर टाकला जात आहे. 

एक जूनपर्यंत सुमारे २५ ते ३० घनमीटर गाळ काढण्यात येईल, असा यांत्रिकी विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार कास तलावात आणखी अडीच कोटी लिटर पाणीसाठा जादा होऊ शकणार आहे. 
 

स्वत:च्या वाहतूक खर्चाने माती घेऊन जावी
कास तलावातील गाळाची माती ही बगीचा, फळबागा, शेतीसाठी उपयुक्त आहे. जे शेतकरी अथवा नागरिकांना ही गाळाची माती हवी असेल, अशांनी पालिकेशी संपर्क साधावा. तलावातून उपसून काढलेली माती मोफत देण्यात येईल. संबंधित नागरिकांनी स्वत:च्या वाहतूक खर्चाने कास येथून गाळाची माती घेऊन जावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: water storage increase in kas lake