पाणीसाठा चांगला; मात्र काटकसर हवी - विजय पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

शिवाजी यादव

शिवाजी यादव
कोल्हापूर - तीव्र उन्हामुळे अख्खा महाराष्ट्र होरपळत असताना पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र गतवर्षी झालेले चांगले पाऊसमान व गेल्या आठ महिन्यांत काटकसरीने पाण्याचा झालेला वापर, याचे फलित म्हणून यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणातील पाणीसाठा समाधानकारक आहे. तरीही काटकसरीने पाणी वापरले तरच तीव्र उन्हात पाणी पुरेशा प्रमाणात वापरता येईल, अशी स्थिती आहे.

मात्र समाधानकारक पाणीसाठा याचा अर्थ उर्वरित दोन महिने कसेही पाणी वापरा, असा नसून पाणी इथून पुढेही काटकसरीनेच पाणी वापरावे लागणार आहे, असे मत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी व्यक्त केले.

गेल्या महिन्याभरापासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. अशात यंदा साखर कारखान्यांचा हंगाम लवकर संपला आहे. काही दिवस शेती रिकामी राहणार म्हणून पुन्हा उसाचे पीक लवकर घेतले जात आहे. अशात उसाला पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पीक वाळू नये, पाणी कमी पडू नये, यासाठी काळजीचा भाग म्हणून पाणी पुरवठ्याच्या वेळा काटेकोरपणे पाळल्या जात आहेत. अशात पाण्याची गरज वाढती आहे. त्यामुळे पाणी उपसा वाढणार ही बाब गृहीत धरली तरी आवश्‍यकतेनुसार काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्‍यक आहे.

दहा वर्षांतील पाऊसमानाचा अंदाज घेता जूनच्या पहिल्या आठवड्यात पडणारा पाऊस काही वेळा जूनच्या अखेरीस किंवा जुलै महिन्यात पडला आहे. जुलै महिन्यात नद्यांना पुरेसे पाणी येण्यासाठी पुन्हा किमान पंधरा दिवस मुबलक पाऊस पडावा लागतो. तेव्हा धरणे भरू लागतात. त्यामुळे प्रत्यक्ष ऑगस्ट महिन्यात धरण भरण्यास सुरवात होते. काही वेळा 15 ऑगस्टनंतरही धरणे भरली आहेत. त्यामुळे पाऊस वेळेत सुरू झाला तरी प्रत्यक्ष धरणात पाणीसाठा सक्षम व पुरेसा होण्यासाठी जून-जुलैतील पाऊस पुरेसा पडेल असे नाही. सध्या असलेले पाणी मे व जून महिन्यातही वापरावे लागते. त्यामुळे अजूनही दोन ते तीन महिने पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.

मॉन्सूनचे अंदाज सध्या वर्तविले जात आहेत. त्यामुळे पाऊस वेळेवर येईल, असे सांगितले जाते तरी अद्याप महिना आहे. त्यामुळे आत्तापासून पाण्याचा कसाही वापर केला तर पाणी साठा कमालीचा घटू शकतो. त्यामुळे उपलब्ध सध्या काटकसरीने वापरणे आवश्‍यक असल्याचे कार्यकारी अभियंता पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील धरणातील साठा
काळम्मावाडी धरणात गतवर्षी 2.75 इतका पाणीसाठा होता. गेल्या आठ महिन्यांत पाणी काटकसरीने वापरले आहे. तसेच पाऊसमानही चांगले झाल्याने यंदा साडेआठ टीएमसी पाणी धरणात आहे तर राधानगरी धरणाचा पाणी साठा 2 टीएमसी आहे. गतवर्षी तेवढाच पाणी साठा राधानगरी धरणात होता. यंदा अन्य धरणांच्या स्थितीत वारणा 8.72 टीएमसी तर तुळशी 7.5 टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, कुंभी कासारी, पाटगाव या धरणात 1.5 ते 2 टीएमसी पाणीसाठा आहे.

मे महिना कसोटीचा
यंदाच्या एप्रिल महिन्यातील तापमान 41 अंशापर्यंत गेले आहे. मे महिन्यातही उन्हाचा तडाखा असाच राहिल्यास शिरोळ, हातकणंगले, कागल, तसेच सांगलीतील जवळपास 5 तालुक्‍यांतून पाणी उपसा वाढतो, असा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे तापमान कायम राहिल्यास मे महिना कसोटीचा ठरणार आहे.

कूपनलिका पाणी पातळीत घट
शहरी भागात पिण्याचे पाणी कपडे ते गाड्या धुण्यापर्यंत वापरले जाते. उपसा वाढतो. त्यामुळे शहरी भागातील कूपनलिकांच्या पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे अनेक अपार्टमेंट, सोसायट्या तसेच उंचवट्यावरील भागातील कूपनलिकांच्या पाण्याचा दाबही कमी झाला आहे.

Web Title: water storage management