"पाणीपुरवठा'ची थकबाकी पाच हप्त्यांत भरण्याची संधी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

कोल्हापूर - राज्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेतील ग्राहकांकडे असलेली वीज बिलांच्या थकबाकीची रक्कम पाच हप्त्यांत भरण्याची प्रोत्साहन योजना महावितरणने आणली आहे. राज्यभरातील 42 हजार वीज जोडण्यांची थकबाकी 940 कोटी 7 लाख इतकी आहे, तर व्याजाची रक्कम 512 कोटी 9 लाख इतकी; त्यामुळे एकूण थकबाकी 1 हजार 452 कोटी 15 लाख एवढी आहे. या रकमेच्या वसुलीसाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. 

सार्वजनिक पाणीपुरवठा व उच्चदाब पाणी उपसा जलसिंचन योजनेच्या थकीत वीज बिलापोटी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी व गावकऱ्यांना पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. अशात वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकालाही लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. 

लोकांना पाण्याची आवश्‍यकता आहे. अशातच शेतीपासून पिण्याच्या पाण्यापर्यंतची गरज नियमित वाढती आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वीजपुरवठ्यासाठी लागणारा खर्च मोठा आहे, तो भरून काढण्यासाठी महावितरणलाही पैशांची गरज आहे. पैसे नसतील तर वीज निर्मितीपासून वितरणापर्यंतचे सूत्र बिघडण्याची शक्‍यता असते. अशा स्थितीत लोकांची विजेची मागणी आणि त्यासाठी महावितरणची असलेली पैशाची गरज ओळखून ऊर्जामंत्र्यांनी प्रोत्साहन योजनेचा पर्याय आणला आहे. यामुळे विद्युत ग्राहकांना थकबाकी रक्कम हप्त्यामध्ये भरण्याची सुविधा निर्माण होणार आहे. 

योजनेची वैशिष्ट्ये 
ही योजना वीज बिलांची थकबाकी असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेसाठी लागू राहणार आहे. 
सध्या मूळ थकबाकी असलेल्या वीज बिलांच्या रकमेपैकी 20 टक्‍के रक्कम व चालू महिन्याच्या पूर्ण बिलासमवेत ग्राहकांनी वीज बिल भरल्यानंतर वीज जोडणी पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. 
उर्वरित थकबाकीमुळे रक्कम चार मासिक समान हप्त्यांत एप्रिल ते जुलै या महिन्यांच्या चालू बिलांसोबत भरणे आवश्‍यक आहे. सवलत दिलेले हप्ते चालू बिलांसोबत न भरल्यास महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. 
अशी सवलत ही वीजपुरवठा अद्यापही खंडित न झालेल्या; परंतु थकीत असलेल्या पाणीपुरवठा योजना व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेतील ग्राहकांसाठी लागू आहे. 

Web Title: Water Supply five outstanding opportunity to pay in installments