सटाणा शहरात पंधरा ते अठरा दिवसाआड पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे ऐन हिवाळ्यात सटाणा शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या आरम व गिरणा नद्या कोरड्याठाक झाल्या असून पालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सार्वजनिक विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पालिकेकडून तब्बल पंधरा ते अठरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून शहरवासीयांना ऐतिहासिक पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

सटाणा : गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे ऐन हिवाळ्यात सटाणा शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या आरम व गिरणा नद्या कोरड्याठाक झाल्या असून पालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सार्वजनिक विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पालिकेकडून तब्बल पंधरा ते अठरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून शहरवासीयांना ऐतिहासिक पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

चणकापूर (ता. कळवण) येथील धरणातून गिरणा नदी पात्रात तात्काळ आवर्तन सोडून दुष्काळाशी सामना करणाऱ्या शहरवासीयांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे.

याबाबत आमदार चव्हाण यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले. निवेदनात,  सटाणा शहरास पाणीपुरवठा हा ठेंगोडा (ता.बागलाण) येथील गिरणा नदीपात्रालगत पालिकेच्या विंधन विहिरीवरून करण्यात येत आहे. गेल्या वर्षी शहर व तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे सटाणा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व विहिरींनी तळ गाठला आहे. पालिका प्रशासनाने शहरात पाणीपुरवठ्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने शहरवासीयांना ऐन हिवाळ्यात इतिहासात कधी नव्हे इतक्या मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात सध्या तब्बल पंधरा ते अठरा दिवसा आड पाणीपुरवठा होत असून पंधरा दिवसानंतर पालिकेच्या सार्वजनिक नळांना अवघे पंधराच मिनिटे देखील पाणी येत नसल्याने पुढील पंधरा दिवस पाणी पुरवायचे कसे असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून 600 ते 800 रुपये प्रति टँकर चढ्या दराने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

पाणीटंचाई मुळे त्रस्त झालेल्या महिलांकडून सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी पालिकेच्या विरोधात रिकामे हंडे मोर्चे तर नागरिकांकडून आंदोलनांचे सत्र सुरू आहे.

शहरास सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी चणकापुर धरणातील आवर्तन तात्काळ सोडणे आवश्यक आहे. चणकापुर धरणातुन गिरणा नदीपात्रात पाणी सोडल्यास सटाणा शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी चार्ज होऊन सुरळीत पाणीपुरवठ्यासह पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. तरी चणकापुर धरणातुन तातडीने गिरणा नदीपात्रात आवर्तन सोडण्याबाबत  संबंधिताना तातडीने आदेश करावेत, अशी आग्रही मागणीही आमदार चव्हाण यांनी निवेदनात केली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सटाणा शहराच्या पाणीटंचाईच्या इतिहासात प्रथमच शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना ऐन टंचाई काळात शहरात पालिकेने टँकरने प्रभाग व वार्ड निहाय पाणीपुरवठा केला होता. तसेच ऐन उन्हाळ्यात थेट केळझर (ता.बागलाण) येथील गोपाळसागर धरणातून टँकर भरून आणून शहरात पाणीपुरवठा केला होता. शहरवासीयांना टंचाई जाणवू दिली नव्हती. - दिपीका चव्हाण, आमदार, बागलाण

Web Title: Water supply For Satana city from fifteen to eighteen days