पाण्याच्या टाकीचा वापर पोहण्यासाठी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

मार्केट यार्डातील प्रकार नगरसेविका सुरेखा शहा यांच्याकडून उघड; उदघाटन कधी?
कोल्हापूर - मार्केट यार्डात लाखो रुपये खर्चून बांधलेल्या पाण्याच्या टाकीचा वापर चक्क स्विमिंग टॅंक म्हणूनच सुरू असल्याचा प्रकार आज या प्रभागाच्या नगरसेविका सुरेखा शहा यांनी निदर्शनास आणून दिला आहे.  

मार्केट यार्डातील प्रकार नगरसेविका सुरेखा शहा यांच्याकडून उघड; उदघाटन कधी?
कोल्हापूर - मार्केट यार्डात लाखो रुपये खर्चून बांधलेल्या पाण्याच्या टाकीचा वापर चक्क स्विमिंग टॅंक म्हणूनच सुरू असल्याचा प्रकार आज या प्रभागाच्या नगरसेविका सुरेखा शहा यांनी निदर्शनास आणून दिला आहे.  

प्रभाग क्रमांक २० मार्केट यार्ड हा प्रभाग विस्तृत आहे. तेथील अनेक भागांत पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. त्यासाठी ही टाकी बांधली असून टाकी बांधून दोन वर्षे होत आली तरी या टाकीतून पाणी सोडले जात नाही. आता ही टाकी भरलेली आहे. या टाकीचा वापर स्विमिंग टॅंक म्हणून मुले करत असून टाकीतील या ‘स्विमिंग टॅंकचे उद्‌घाटन तरी कधी’ असा उपहासात्मक प्रश्‍न या प्रभागाच्या नगरसेविका व ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाच्या सभापती सुरेखा शहा यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे. यापूर्वी त्यांनी सर्वसाधारण सभेतही हा प्रश्‍न उपस्थित केला होता.

तरीही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने त्यांनी पाण्याच्या टाकीत पोहणाऱ्या मुलांच्या छायाचित्रासह हे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

मार्केट यार्ड प्रभागात लोणार वसाहत, शाहू मिल, जाधववाडी, महाडिक वसाहत असा मोठा परिसर येतो. भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग मोठा आहे. तसेच शहराच्या एका टोकाला हा प्रभाग येत असल्याने पाणी नेहमीच कमी दाबाने येते. लोकांची अनेक वर्षे तक्रार असल्याने मार्केट यार्ड येथे टाकी बांधली आहे. या टाकीसाठी लाखो रुपयांचा खर्चही केला आहे. टाकी पूर्ण होऊन दोन वर्षे झाली तरी या टाकीतून पाणी सोडले जात नसल्याने अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याच्या तक्रारी अजूनही आहेत. लाखो रुपये खर्च होऊनही प्रश्‍न सुटलेला नाही. पाण्याची टाकी बांधून भरून 
ठेवलेली आहे. 

बायपासनेच पाणी देण्यावर भर
पाण्याची टाकी भरून त्यातून पाणीपुरवठा केला तर नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळते; पण कर्मचारी वर्ग कमी वेळेत काम आटोपण्यासाठी बायपासने पाणीपुरवठा करण्यावर भर देतात. त्यामुळे टाकी भरण्यासाठी ते टाळाटाळ करतात. टाकी भरून पाणीपुरवठा केला तर नागरिकांना उच्च दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो.

तर जबाबदार कोण?
मुले पोहत असताना एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा सवालही शहा यांनी उपस्थित केला आहे. टाकीतून पाणीही सोडले जात नाही. नागरिकांना त्याचा कोणताही उपयोग नसल्याने ही टाकी नेमकी कशासाठी आणि कोणाच्या सोयीसाठी बांधली आहे, असाही सवाल केला जात आहे. या प्रभागातील काही जागरूक नागरिक प्रामुख्याने अभिषेक जाधव, संदीप टोणे, अमित कारंडे, संतोष जाधव, शिवनाथ जगताप यांनी या टाकीत जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला आहे.

Web Title: water tank use for swimming