वर्षातच घटली टॅंकरची संख्या

विशाल गुंजवटे
शुक्रवार, 31 मार्च 2017

माणमध्ये ‘जलयुक्त’ची किमया; गेल्या वर्षीपेक्षा २६ टॅंकर कमी
बिजवडी - जलयुक्त शिवार अभियानाने किमया साधल्याने माण तालुक्‍याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होते. त्याचाच प्रत्यय पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरवरून येत आहे. मार्च २०१६ मध्ये तालुक्‍यात ४२ टॅंकरने टंचाईग्रस्त गावे व वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावर्षी मार्चमध्ये फक्त १६ टॅंकरनेच पाणीपुरवठा सुरू आहे. 

माण तालुक्‍यात गेल्या दोन वर्षांपासून बहुतांश गावात जलयुक्त शिवार अभियानातंर्गत ओढे- नाले, तलाव, बंधाऱ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण व गाळ काढण्याची, तसेच डीपसीसीटीबरोबर नवीन सिमेंट बंधाऱ्यांची कामे झाली. प्रत्येक ठिकाणी पाणीसाठ्यात दुपटीपेक्षा वाढ झाली असताना वरुणराजाने काही भागांत कृपादृष्टी दाखवली, तर बहुतांश भागात अवकृपा दाखवल्याने ‘जलयुक्त’मधील केलेली कामे कोरडीच राहिली. 

माण तालुक्‍यात अधिकारी व जलदूतांनी गावोगावी बैठका घेऊन ‘जलयुक्त’बाबत ग्रामस्थांत जनजागृती करून लोकसहभागातून कामे करण्यास प्रवृत्त केल्याने हे अभियान यशस्वी झाले. कायम पाणीटंचाई असलेल्या गावांनी या अभियानात उत्सफूर्तपणे भाग घेऊन कामे केली. त्याच कामाचा फायदा आता दिसून येत आहे. चांगला पाऊस झालेल्या ठिकाणी पाणीसाठ्यात वाढ झाल्याने या गावांचे टॅंकर बंद झाले. ज्या भागात ‘जलयुक्त’ची चांगली कामे झाली आहेत, त्या भागात पाऊस न झाल्याने टॅंकरला वाढती मागणी होऊ लागली आहे. त्यात बिजवडी, राजवडी, जाधववाडी, पाचवड, पांगरी आदी गावांचा समावेश आहे.

माण तालुक्याची टँकरमुक्तीकडे वाटचाल
‘जलयुक्त’च्या माध्यमातून माण तालुक्‍यात जलक्रांती झाली असताना जनतेच्या उत्स्फूर्त सहभागामुळे येत्या दोन महिन्यांत आणखी कामे होणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पाणीटंचाई दूर होण्यास मदत मिळेल. तालुक्‍याची टॅंकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसते. यंदा टॅंकरची कमी झालेली संख्या पाहता हे अभियान यशस्वी झाल्याचे दिसते. यावर्षी तालुक्‍यात चांगला पाऊस झाला, तर निश्‍चितच माण तालुका टॅंकरमुक्त होऊ शकतो, असा विश्‍वास निर्माण झाला आहे.

Web Title: water tanker decrease