राज्यात दर आठवड्याला तीनशे टॅंकरची भर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

सद्यःस्थितीत आठ हजार गावांना 2,900 टॅंकरद्वारे पाणी
सोलापूर - राज्यातील बहुतांश मध्यम व लघु प्रकल्प कोरडे पडले असून, आता कडक उन्हामुळे मोठ्या धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने खालावत आहे. दुष्काळामुळे जमिनीतील पाणीपातळीही खालावली असून, दर आठवड्याला राज्यात तीनशे टॅंकरची भर पडते आहे.

सद्यःस्थितीत आठ हजार गावांना 2,900 टॅंकरद्वारे पाणी
सोलापूर - राज्यातील बहुतांश मध्यम व लघु प्रकल्प कोरडे पडले असून, आता कडक उन्हामुळे मोठ्या धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने खालावत आहे. दुष्काळामुळे जमिनीतील पाणीपातळीही खालावली असून, दर आठवड्याला राज्यात तीनशे टॅंकरची भर पडते आहे.

सद्यःस्थितीत राज्यातील दहा हजार 790 गावे व वाड्या-वस्त्यांवर टॅंकरची गरज असतानाही सात हजार 793 ठिकाणीच टॅंकर सुरू आहेत. शासकीय निकषांची पडताळणी केल्याशिवाय टॅंकर देऊ नयेत, अशा सूचना राज्य सरकारने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

गतवर्षी राज्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने जलयुक्‍त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामांचाही फायदा टंचाई निवारणासाठी होताना दिसून येत नाही. दुसरीकडे, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या योजनाही रखडल्या असून, अधिग्रहित विहिरींमधील पाणीही खोलवर गेले आहे. बहुतांश विहिरीत पाणीच नसल्याचे चित्र आहे. तसेच, भूगर्भातील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर दुष्काळी तालुक्‍यांमधील गावे व वाड्या-वस्त्यांवरील गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाण्यासाठी बहुतांश गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असून, लोकांमध्ये भांडणेही होत आहेत. दुसरीकडे मात्र शासकीय निकषांमुळे टॅंकर वेळेवर मिळत नसल्याची चर्चा आहे.

नऊ जिल्ह्यांमध्ये 2,599 टॅंकर
राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये तब्बल दोन हजार 599 टॅंकर सुरू झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 793 टॅंकर औरंगाबादमध्ये सुरू झाले आहेत. त्यानंतर बीडमध्ये 507, नगरमध्ये 519, जालन्यात 291, सांगलीत 107, सोलापुरात 100, बुलडाण्यात 99, साताऱ्यात 97 आणि पुण्यात 87 टॅंकर सुरू झाल्याची माहिती राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिली.

आकडेवारी
राज्याची विभागनिहाय स्थिती (कंसात गावांची संख्या)

कोकण - 31 (76)
नाशिक - 719 (3,129)
पुणे - 367 (2,753)
औरंगाबाद - 1,689 (1,741)
अमरावती - 99 (94)
एकूण - 2,905 (7,793)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Tanker Water Shortage Drought