पुरावे दिलेत; आता कारवाई करा 

विजयकुमार सोनवणे 
शनिवार, 19 मे 2018

या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत एकाही मक्तेदाराचे बिल दिले जाणार नाही, असे आयुक्तांनी शिष्टमंडळाला सांगितले आहे. 
- नागेश वल्याळ, नगरसेवक

सोलापूर : महापालिकेच्या टॅंकरमधून पाणी पुरविण्यात झालेल्या गैरव्यवहाराची माहिती "गिफ्ट'च्या स्वरूपात भाजप नगरसेवकांनी  आयुक्तांना दिली. पुरावे दिल्याने आता दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी त्यांनी केली. 

नगरसेवक नागेश वल्याळ, श्रीनिवास करली, संतोष भोसले, नगरसेविका संगीता जाधव, राजेश्री जाधव, अश्‍विनी राठोड यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, टॅंकरने पाणी पुरविण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. बहुतांश ठिकाणी टॅंकरने पाणी पुरविल्याच्या कोणत्याही नोंदी नाहीत. शंभरच्या आत खेपा झाल्या असतानाही दीडशेच्या वर खेपा झाल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात तशा नोंदी नाहीत. त्यामुळे या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. 

अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली की आयुक्त पुरावे मागतात. त्यामुळे आम्ही पुराव्यासह कागदपत्रे ' गिफ्ट' च्या स्वरूपात आयुक्तांना दिली आहेत. त्याची तपासणी करून संबंधितांवर कारवाईची मागणी या नगरसेवकानी केली. 

शहरात टॅंकरने पाणीपुरवठा होणाऱ्या कामाची तपासणी करण्यात यावी. मक्तेदार दोषी असेल तर त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत मक्तेदारांचे कोणतेही बिल देऊ नये. चौकशीअंती स्पष्टीकरण झाल्यावरच बिल द्यावे. प्रत्येक खेपेची नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश खेपांच्या नोंदी केल्याचे दिसून आलेले नाही. टंचाईच्या कालावधीत 176 ठिकाणी पाणी पुरवल्याचे बिल देण्यात आले आहे. प्रत्यक्षात नोंदी मात्र 76 ठिकाणच्याच आहेत, अशा नोंदी सर्व विभागीय कार्यालयातून तपासल्या जाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. 

या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत एकाही मक्तेदाराचे बिल दिले जाणार नाही, असे आयुक्तांनी शिष्टमंडळाला सांगितले आहे. 
- नागेश वल्याळ, नगरसेवक

Web Title: water thief in Municipal corporation water tanker