कऱ्हाड- पाटण तालुक्‍यांत महापूर ; अनेक गावांत पाणी घुसले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

पावसाची संततधार आणि कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने अनेक गावांत पाणी घुसले असून, अनेक कुटुंबे स्थलांतरित करावी लागली आहेत.

कऱ्हाड/पाटण  ः कऱ्हाड- पाटण तालुक्‍यांत 2005 नंतर पहिल्यांदाच महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दोन्ही तालुक्‍यांतील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले आहे. पावसाची संततधार आणि कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने अनेक गावांत पाणी घुसले असून, अनेक कुटुंबे स्थलांतरित करावी लागली आहेत. कऱ्हाड- चिपळूण महामार्ग रात्रीपासून बंद असल्याने नवारस्ता येथून पाटणकडे येणारी वाहने अडविण्यात आली आहेत. त्यामुळे मोठी गैरसोय झाली आहे. 

यशवंतराव चव्हाणांची समाधी पाण्याखाली 

कऱ्हाड ः कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने आणि मुसळधार पाऊस कायम असल्याने कृष्णा- कोयना नद्यांना पूर आला आहे. कऱ्हाडच्या कृष्णा- कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर असलेल्या ज्येष्ठ नेते (कै.) यशवंतराव चव्हाण यांचा समाधी परिसर आज सोमवारी सकाळी पाण्याखाली गेला. अनेक घरांत पाणी घुसले आहे. शहरातील शनिवार पेठ, पाटण कॉलनीसह सखल भागात पाणी आले असून, अनेक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. प्रशासनानेही अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. कऱ्हाड- विटा मार्गावर कृष्णा कॅनॉल ते गजानन हाउसिंग सोसायटी दरम्यान साचून राहिलेल्या पाण्याने वाहतुक विस्कळित झाली आहे. दरम्यान कृष्णा कॅनॉल ते गोवारे दरम्यानचा रस्ता आज पहाटे खचला. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. 

कऱ्हाड- ढेबेवाडी रस्ता खचला 

विंग ः पावसाने कऱ्हाड- ढेबेवाडी चौपदरी रस्त्याचा भराव पाण्याने वाहून दहा फुटांनी रस्ता त्याठिकाणी खचला. खचण्याचे प्रमाण वाढत असून, धोकादायक स्थितीमळे रात्री अपरात्री अपघाताची शक्‍यता आहे. संबंधित बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष केले आहे. पोतलेत स्मशानभूमीची संरक्षण भिंत कोसळली आहे. पोतले- येणके, आणे, अंबवडे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने त्यापलीकडील गावचा संपर्क तुटला आहे. पोतलेत दलित वस्ती पाणी घुसले आहे. जुनी स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. महादेव मंदिर परिसराचा काही भाग खचला आहे. येणकेत स्मशानभूमीला पाणी लागले आहे 
 

पाटणमध्ये पुराचे थैमान 

पाटण ः कोयना धरणातील सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदी काठावर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कऱ्हाड- चिपळूण महामार्ग रात्रीपासून बंद असल्याने नवारस्ता येथून पाटणकडे येणारी वाहने अडविण्यात आले आहेत. नेरळे, मूळगाव व निसरे पूल पाण्याखाली गेल्याने सांगवड पुलावरून मोरणा व मारूल- हवेली विभागात वहातूक सुरू आहे. पाटण शहरातील कुटुंबांना सुरक्षिततेसाठी नातेवाइकांकडे हलविण्यात आले आहे. कऱ्हाड- चिपळूण महामार्ग बंद झाल्याने पाटण आगारात कोकणात जाणारे 30 प्रवाशी अडकून पडले होते. त्यांना प्रशासनाने (कै.) ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल येथे स्थलांतरित केल्याची माहिती प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली. 

 

पांढरेपाणीचा संपर्क तुटला 

मोरगिरी : पाटण तालुक्‍यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मोरणा नदीला आलेल्या पुरामुळे पांढरेपाणी येथील रामचंद्र केसू शेळके यांच्या दोन म्हशी वाहून गेल्या. ग्रामस्थांनी लाकडाच्या साहाय्याने बनवलेला गोळण्याच्या ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने पांढरे पाणी गावाचा हुंबरणे गावाशी असलेला संपर्क तुटला आहे. अती दुर्गुम असलेल्या या गावाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

 

झाड पडून वाहतूक ठप्प 

चाफळ ः चरेगाव- पाडळोशी रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. उंब्रज व पाटण मार्गावरून चाफळ पासून दाढोली, पाडळोशी, केळोली व विरेवाडी या मार्गावर सदर रस्त्याने वाहतूक सुरू असते. शंकरराव मोरे यांनी जेसीबी व इतर यंत्रणेच्या मदतीने झाड रस्त्यावरून हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

 

सवारवाडीत जमीन खचली 

तारळे ः सवारवाडीत शेतजमीन खचल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. संततधार पावसाने लावलेली हजेरी व दोन दिवसांत पडलेला मुसळधार पाऊस याने डोंगर उतारावरील खचण्याचा प्रकार सुरू असून, गावाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचे सूचना दिल्या आहेत. तारळेपासून सात किलोमीटर अंतरावर डोंगरावर सवारवाडी गाव आहे. गावात सुमारे 16 घरे असून, पन्नास लोक वास्तव्यास आहेत. गेली बारा दिवस विभागात अतिवृष्टी सुरू आहे. शिव नावाच्या शिवारातील सुमारे पाच एकर परिसरातील शेतजमीन खचू लागली आहे. गावच्या खालून पाणी मुरून खाली येत असल्याने धोका वाढला आहे. आज सकाळी मंडलाधिकारी सीताराम कदम, तलाठी राजेंद्र देशमुख, पोलिस पाटील दिगंबर कदम, कृषी सहायक मोहन साळुंखे, पूजा माने आदींनी गावात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असून, पंचनामे केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water was infiltrated in several villages