जलवाहिन्यांना गळतीने लाखो लिटर पाणी वाया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

सातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी शाहूनगर- गोडोलीमधील जलवाहिनीच्या गळत्या काढलेल्या होत्या, तरीही पुन्हा येथील अजिंक्‍य बझार चौक, दूरध्वनी कार्यालयानजीक, तसेच गोडोली कमानीनजीक मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. परिणामी लाखो लिटर पाणी वाया जात असून, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 

गोडोली येथील साईबाबा मंदिर ते किल्ले अजिंक्‍यतारा रस्त्यावरील कमानीनजीक लागलेली जलवाहिनी गळती काढण्यासाठी स्थानिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर गळती काढण्याचे काम करण्यात आले. या भागातील दूरध्वनी कार्यालयानजीक देखील झालेली जलवाहिन्यांची गळती काढण्यात आली; परंतु पाण्याच्या दबावामुळे याठिकाणी सातत्याने जलवाहिन्यांना गळती लागत आहे. यामुळे रस्त्यावर खड्डे पडत आहेत. या भागात शाळा, बॅंका, रुग्णालय, तसेच किल्ले अजिंक्‍यतारा येथे जाण्यासाठी वाहनांची वर्दळ असते. खड्ड्यांमुळे छोटे- मोठे अपघात होत आहेत. 

या भागात नव्याने रस्त्याचे डांबरीकरणाचे काम होणार असल्याने सद्य:स्थितीत रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे डांबरीकरण्याच्या कामाचा उपयोग होणार नाही. रस्ता काही दिवसांतच पुन्हा उखडेल. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुन्हा एकदा या भागातील जलवाहिन्यांच्या गळत्या काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.

Web Title: waterline leakage water waist