आम्हांला "शिवशाही' बस नकाे ; प्रवाशांची मागणी

संजय साळुंखे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

सातारा येथील विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे यांना प्रवाशांच्यावतीने धनश्री महाडिक, मनोजकुमार तपासे, सुषमा घोरपडे, गणेश शिंदे, नाजीम इनामदार, विशाल पवार आदींनी शिवशाही बस बाबत निवेदन दिले.

सातारा : सातारा- पुणे विनावाहक- विनाथांबा बससेवेत "शिवशाही'च्या फेऱ्या वाढवल्याने प्रवाशांना होणाऱ्या आर्थिक भुर्दंडाचे पडसाद आज उमटले. या सेवेत प्राधान्याने साध्या बसचा (लालपरी) वापर करण्याची मागणी जिल्हा कॉंग्रेस समितीतर्फे करण्यात आली. या निर्णयात बदल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
 
सातारा-पुणे विनाथांबा बससेवा तीन दिवसांपासून "शिवशाही'च्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. सध्याच्या नियोजनानुसार शिवशाहीच्या 12 ऐवजी 28 फेऱ्या करण्यात आल्या असून, साध्या बसच्या 40 ऐवजी 28 फेऱ्या करण्यात आल्या आहेत. या सेवेतील साध्या बसचा तिकीट दर 135 रुपये, तर "शिवशाही'चा दर 200 रुपये आहे. त्यातून प्रवाशाला 65 रुपयांचा भुर्दंड बसत आहे. या बदलामुळे प्रवाशांची मागणी नसतानाही "शिवशाही'चा अतिरिक्त डोस दिला जात आहे. महामंडळाच्या सातारा विभागाने घेतलेल्या या निर्णयाला प्रवाशांतून मोठा विरोध होत आहे.

जिल्हा कॉंग्रेसने दिले निवेदन

जिल्हा कॉंग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे यांना निवेदन दिले. या वेळी जिल्हा कॉंग्रेसच्या महिला अघाडीच्या अध्यक्षा धनश्री महाडिक, उपाध्यक्षा सुषमा घोरपडे, मनोजकुमार तपासे, नाजीम इनामदार, विशाल पवार, गणेश शिंदे आदींनी श्री. मोरे यांच्याशी चर्चा केली.

हेही वाचा -  "शिवशाही' बसकडे प्रवाशांची पाठ

प्रवाशांची मागणी नसतानाही "शिवशाही' बस वाढवणे चुकीचे आहे. प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत असेल, तर ही सेवा बंद करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. "शिवशाही'चे चालक अप्रशिक्षित आहेत, असे स्पष्ट करत कालच शिंदेवाडीनजीक झालेल्या अपघाताचे उदाहरण देण्यात आले. महामंडळाचा "शिवशाही' बसचा आग्रह असेल, तर साध्या बसच्या दरात ती सुरू ठेवावी, असेही सुचवण्यात आले. "शिवशाही'साठी प्रशिक्षित चालक नेमावेत, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला.

प्रायोगिक तत्त्वावर बस वाढविल्याचा दावा
 
सातारा विभागासाठी नव्याने काही "शिवशाही' बस दाखल झाल्या आहेत. त्यातील काही बस या सातारा- पुणे मार्गासाठी वापरण्यात येत आहेत. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग केला आहे, अशी माहिती देऊन श्री. मोरे यांनी निवेदनातील मागण्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. तिकीट दरातील फरकाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होईल. त्यासंबंधीही वरिष्ठांशी चर्चा करू, असेही त्यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We Don't Want "Shivshahi" Bus ; Demand From Passengers