... तर आम्ही देऊ भूमिपुत्रांना नोकऱ्यात 75 टक्के आरक्षण : पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

आंध्र प्रदेशमध्ये सत्तेवर आलेल्या जगनमोहन रेड्डी सरकारनं भूमिपुत्रांना खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला आहे.

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आमचं सरकार सत्तेत आल्यास राज्यातील भूमिपुत्रांना खासगी व शासकीय नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण देणार, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) सोलापूर येथे केली. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम राज्यभरात सुरू आहे. यानिमित्त पवार सोलापूर दौऱ्यावर आले होते.

आंध्र प्रदेशमध्ये सत्तेवर आलेल्या जगनमोहन रेड्डी सरकारनं भूमिपुत्रांना खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला आहे. राज्यात पक्षाचा पाया भक्कम करण्यासाठी व राष्ट्रीय पक्षांना रोखण्यासाठी जगनमोहन यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे जगनमोहन यांचाच पाढा गिरवत अजित पवार यांनी ही घोषणा केल्याचे दिसून येते.

देशासह राज्यातही बेरोजगारांची संख्या मोठी आहे. अनेक तरूण गावाकडून शहरात स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. हा मुद्दा पवार यांनी निवडणूक प्रचारादरम्यान उचलून धरल्यास भाजप-शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We give 75 percent reservation in employment to landowners says Ajit Pawar