इतिहासप्रेमींनो...पन्हाळागड ढासळतोय

मोहन मेस्त्री
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्यापैकी पन्हाळगड एक होता. या गडावरील विविध रेखीव दगडी वास्तूंच्या वेगळेपणामुळे या गडाचे वैभव परिचित आहे. गडावरील काली बुरूज, तीन दरवाजा, राजदिंडी, धान्याचे कोठार, अशा वास्तू पर्यटक आणि इतिहासप्रेमींचे आवडते ठिकाण ठरल्या आहेत. 

पन्हाळा ( कोल्हापूर ) - पन्हाळगडाच्या बुरुजाची पडझड होतेय.. ढासळतोय, तटबंदी ढासळतेय, प्रशासनाने लक्ष देण्याबाबत इतिहासप्रेमींची नेहमीच तक्रार होत आली आहे. पन्हाळगडाचेच नाही, तर कोल्हापूरचे वैभव असलेल्या तीन दरवाजावरील झाडे-झुडपांबाबतही तक्रारी होत राहिल्या; पण पुरातत्त्व खात्याने या दुरुस्तीकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळेच की काय, तीन दरवाजाच्या दगडी छतालाच भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. 

याला पन्हाळ्यावरील सरासरीपेक्षा अधिक पाऊस जबाबदार नाही. तर या ठिकाणावरून चालू असलेली अवजड वाहनांची वाहतूक आहे. वाहनांच्या धक्‍क्‍याने दगड कोसळत असल्याचे अनेक दुर्गप्रेमींनी सांगितले; पण याकडे दुर्लक्ष झाल्यास गडावरील सज्जा कोठीप्रमाणे ही वास्तूही नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

तीन दरवाजाचे वैशिष्ट्य वेगळे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्यापैकी पन्हाळगड एक होता. या गडावरील विविध रेखीव दगडी वास्तूंच्या वेगळेपणामुळे या गडाचे वैभव परिचित आहे. गडावरील काली बुरूज, तीन दरवाजा, राजदिंडी, धान्याचे कोठार, अशा वास्तू पर्यटक आणि इतिहासप्रेमींचे आवडते ठिकाण ठरल्या आहेत. 
तीन दरवाजाचे वैशिष्ट्य हे की देशभरातील कोणत्याही किल्ल्याचे प्रवेशद्वार अशा प्रकारच्या बांधणीचे नाही. देशभरातील सर्व किल्ल्यांची तटबंदी आणि बुरूज साधारणतः एकसारखे असतात; पण तीन दरवाजाचे चित्र किंवा प्रतिमा पाहताच तो पन्हाळगड आहे, हे ओळखून येते. हेच या किल्ल्याच्या बांधकामाचे विशेष आहे. 

कोंडाजीने जिंकला गड

भोजराजाच्या कालावधीत बांधकाम सुरू झालेल्या या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 नोव्हेंबर 1656 रोजी पाऊल टाकले होते. कोंडाजी या सरदाराने केवळ 60 मावळ्यांच्या साथीने या किल्ल्यावर विजय प्राप्त केला होता. शिवाजी महाराजांनी विजयाप्रीत्यर्थ सोन्याच्या मोहरा उधळून कोंडाजीचे कौतुक केले होते. इतकेच नाही तर सकाळ होण्याची वाट न पाहता रात्रीच मशालीच्या उजेडात गडाची पाहणी केली होती, अशा प्रकारचा वेगळा इतिहास असलेल्या या गडाबद्दल ईस्ट इंडिया कंपनीचे कर्नल विल्स यांनीही "कला आणि निसर्ग यांचा संगम असलेला सुरेख किल्ला' असे वर्णन लिहून ठेवले आहे. 

गडाच्या तटबंदीवर उगवली झाडे-झुडपे

अशा या किल्ल्यावरील बांधकामाकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. गडाच्या तटबंदीवर झाडे-झुडपे उगवली आहेतच. शिवाय पश्‍चिमेकडील बाजूला तर कडाही दगडांसाठी खोदाई करण्याचे निंदनीय कृत्य होत आहे; पण तीन दरवाजावर उगवलेली झाडे-झुडपे बांधकामाचे दगड हालवत आहेत. त्यांच्यासोबत या दरवाजातून गडाखाली जाणारे ट्रॅक्‍टर आणि वाहनांची वाहतूक या वास्तूसाठी धोकादायक ठरत आहे. दरवाजाचे अनेक दगड ट्रॅक्‍टरच्या धक्‍क्‍याने तुटून ढासळले आहेत. त्यामुळे संपूर्ण कमानीच्या दगडांनाच धोका पोहचत आहे. आता तर या भक्कम दगडी बांधकामालाही घरघर लागली आहे. पश्‍चिम दरवाजाकडील कमानीतल्या छताला मोठी भेग पडली आहे. दुसऱ्या कमानीच्या जोडापासून सुरू झालेली ही भेग या वास्तूच्या बांधकामाला धोकादायक ठरणारी आहे. ही भरण्याचे काम तज्ज्ञांकडून करून घेण्याची गरज आहे. 

हेही पाहा - चला ! पंचगंगा घाट अनुभवूया; जाणून घेऊया दडलेला इतिहास 

गडाचे वैभव जपण्याची गरज 

पन्हाळगडावरील तटबंदी अनेक ठिकाणी ढासळली आहेच. दुर्लक्षामुळे काही वास्तू नामशेष झाल्या आहेत. सज्जाकोठी याचे उदाहरण आहे. सज्जाकोठी ढासळतेय म्हणून अनेक वर्षे इतिहास आणि दुर्गप्रेमी ओरडत होते; पण या वास्तूचा शेवटचा दगड आता ढासळण्याची वेळ आली, तरी त्याचे संवर्धन झाले नाही, ही जशी दुर्दैवाची बाब आहे. तीन दरवाजाची पडझड होऊ लागली, तर गडाचे वैभव नष्ट होऊन केवळ दगडच शिल्लक राहतील आणि याचा तोटा पन्हाळ्याच्या पर्यटनावरही होणार आहे, याची जाणीव सर्वांनीच ठेवणे गरजेचे आहे. 

हेही पाहा - PHOTO : सोळाव्या शतकापासूनच्या कागदपत्रांची पुस्तके पाहायला मिळतील इथे 

जबाबदारी पुरातत्त्व खात्याने घेणे आवश्‍यक

पन्हाळगडचा इतिहास वैभवशाली आहे, या वास्तूंचे जतन करून हे वैभव टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाप्रमाणे सर्वांचीच आहे. प्रशासनाने केवळ पर्यटकांना किल्ल्यावर फोटोग्राफीवर बंदी घालून हा वारसा जतन होणार नाही. उलट या वास्तूच्या प्रतिमा प्रत्येक घराचे वैभव वाढवणारी ठरेल, अशा प्रकारे या पुरातन वास्तूंचे जतन करण्याची जबाबदारी पुरातत्त्व खात्याने घेणे आवश्‍यक आहे. 
- सशिन कुंभोजकर (दुर्गप्रेमी व इतिहास अभ्यासक)  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wear And Tear Of Panhala Fort Needs Conservation