अक्षयतृतीया निमित्त लोणंद येथे पायी वारीचे स्वागत

Welcoming of Wari on the occasion of Akshay Trutiya at Lonand
Welcoming of Wari on the occasion of Akshay Trutiya at Lonand

लोणंद : अक्षयतृतीया निमित्त तुळजापूरहून पायी वारी करत निघालेल्या शिरवळ व नायगाव येथील श्री. अंबिकामाता देवींच्या सासन काठयांचे लोणंद येथे आज (ता. 6) मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यावेळी दर्शन व नारळाची तोरणे बांधण्यासाठी महिला व नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.

या काठ्यांच्या स्वागतासाठी लोणंद येथील श्री. अंबामाता देवी, श्री. कालभैरवनाथ, श्री. म्हस्कोबानाथ देवाच्या काठ्याही पारंपरिक पद्धतीने सहभागी झाल्या होत्या. यावेळी ढोल ताशांच्या गजरात व गुलालाच्या उधळणीत काठयांची शहरातील प्रमुख रस्त्यायावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे लोणंदनगरीला यात्रेचे रुप आले होते.

नायगाव व शिरवळ देवीच्या सासन काठयांचा रात्रीचा तरडगाव येथील मुक्काम संपून आज सकाळी 7 वाजता लोणंद नगरीत अगमन झाले. त्यावेळी काठयांची शास्त्री चौकात पारंपरिक पद्धतीने श्रीमती लक्ष्मीबेन रावळ व कुटुंबियांनी काठयाचे नारळाची तोरणे बांधुन व खणा नारळाने ओटी भरून पुजन केले. यावेळी जयकुमार रावळ, प्रविणकुमार रावळ, बिपीनकुमार रावळ उपस्थित होते.

लोणंदकर ग्रामस्थांनी या सासन काठ्यांची गुलालाची उधळण करीत व ढोल-लेझीमच्या गजरात शास्त्री चौक, गांधी चौक, जुनी पेठ, तानाजी चौक, विठ्ठल मंदिर या मार्गे भवानीमाता मंदिर आवारात नेल्या. यावेळी नवस बोललेले भाविक सासन काठ्यांना नारळ, नोटांची तोरणे बांधत होते तर महिला खण नारळाने ओटी भरत होते. काठ्याबरोबर आलेल्या शेकडो आराधी भक्तांना भाविकांनी मीठ, पीठ, मिरची, तेल, दक्षणा आदींचा शिधा देत होते.

यावेळी तानाजी चौक, लक्ष्मी मंदिर रस्त्यावर मेवा मिठाई,खेळणी व वस्तू विक्रेत्यांची शेकडो दुकाने लावण्यात आली होती. दुपारी एकच्या सुमारास खेड बुद्रुककडे मार्गस्थ झाला. तेथेही खेडच्या काठीच्या यात्रेचा मुख्य दिवस असल्याने तेथेही काठ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिरवळ व नायगाव येथे आज रात्री या काठया पोचतील उदया (ता. 7) अक्षय तृतीयाला या दोन्ही गावाच्या यात्रा आहेत. लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गिरिश दिघावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com