अब्दुल करीम खॉं संगीत महोत्सवाकडे दिग्गज कलाकारांची पाठ

well known artist attending music festival in miraj
well known artist attending music festival in miraj

मिरज : येथील ख्वॉजा मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या संगीत रत्न अब्दुल करीम खॉं स्मृती संगीत महोत्सवास यावर्षी करोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक दिग्गज कलाकार अनुपस्थित राहणार आहेत.

तथापि स्थानिक कलाकारांच्या सहाय्याने सेवेत सातत्य राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उरुसाच्या मुख्य दिवशी दर्गा परिसरातील चिंचेच्या झाडाखाली परंपरेप्रमाणे सादर होणारी गायनसेवा यावर्षीही किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायकाच्या उपस्थित होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. 

गेल्या 86 वर्षांपासून येथील ख्वॉजा मीरासाहेब दर्ग्यामध्ये या संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये देशभरातील अनेक दिग्गज कलाकार आपली गायन-वादन सेवा सादर करतात. सांगली, कोल्हापूर, सोलापूर सह अनेक नवोदित नाटकातील कलाकारांसाठी हा संगीत महोत्सव म्हणजे एक पर्वणी असते. केवळ कलाकार आणि रसिकांच्या प्रतिसादामुळे गेली 86 वर्षे ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. किराना घराण्याचे अध्वर्यू संगीतरत्न अब्दुल करीम खॉं हे ख्वॉजा मीरा साहेबांचे निस्सीम भक्त होते.

दर्ग्यावरील त्यांच्या अपार श्रद्धेपोटी अब्दुल करीम खॉं साहेब प्रत्येक वर्षी दर्ग्याच्या उरुसाच्या मुख्य दिवशी चिंचेच्या झाडाखाली बसून आपली गायन सेवा सादर करीत. त्यांची ही परंपरा खॉंसाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिष्य वर्गाने गेल्या 86 वर्षांपासून टिकवून ठेवली आहे. या संगीत महोत्सवाचा प्रारंभ उरुसाच्या मुख्य दिवशी चिंचेच्या झाडाखाली किराना घराण्यातील ज्येष्ठ गायकाच्या गायनाने होतो. त्यानंतर सलग तीन दिवस देशभरातील दिग्गज कलाकार हजेरी लावतात.

यावर्षीच्या संगीत महोत्सवास 21 मार्च (शनिवार) पासून प्रारंभ होणार आहे. यामध्ये शोभा मुदगल (दिल्ली), पंडित अजय पोहनकर, पंडित नित्यानंद हळदीपूर, (मुंबई) उस्ताद मशहूर अली खॉं (कोलकत्ता) रफिक खान शफिक खान, छोटे रहिमत खॉं, चंद्रशेखर वझे (मुंबई) शहाना बॅनर्जी (पुणे), पंडित विश्वनाथ कान्हेरे (मुंबई) उस्ताद अन्वर हुसेन आणि पंडित योगराज यासारखे नामवंत गायक आणि वादक आपली कला सादर करणार आहेत. परंतु यापैकी बहुतांशी कलाकार हे पुण्यापर्यंत विमानाने आणि तेथून खासगी वाहनाने मिरजेस येतात.

करोना साथीमुळे सरकारी यंत्रणांनी देशभरातील विमानतळांसह सर्वत्रच दक्षतेचा इशारा दिला असल्याने यापैकी बहुसंख्य कलाकारांनी संयोजकांकडे विचारणा करून त्यांच्या येण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. सहाजिकच संयोजकांनी आता स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून ही परंपरा खंडित होऊ नये याची दक्षता घेतली आहे. 

झाडाखालच्या गायन सेवा परंपरेत खंड नाही 

मिरज येथील मिरासाहेब दर्ग्याच्या परिसरात ज्या चिंचेच्या झाडाखाली बसून किराना घराण्याचे अध्वर्यू संगीत रत्न अब्दुल करीम खॉं आपली गायन सेवा रुजू करीत असत त्याठिकाणी किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायकाची गायन सेवा 21 मार्च (शनिवारी) प्रथेप्रमाणे रुजू होईल. त्यामध्ये कोणताही खंड पडणार नसल्याचे संयोजकांनी सांगितले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com