मित्राच्या शोधात गेला नि गायब झाला.. 

राजू घुगरे 
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

गावातील नागरिकांना तो बंधाऱ्यातील पाण्यात बुडाल्याची शंका आली. त्यानुसार त्याचा पाण्यात शोध घेण्याचे ठरले. त्याला शोधण्यासाठी काल (सोमवारी) सायंकाळी चारच्या सुमारास अमृत चोपडे हा तरुण पाण्यात उतरला. मात्र, बराच वेळ झाल्यानंतर तोदेखील वर आलाच नाही

अमरापूर (शेवगाव) : पोहण्यासाठी नदीतील बंधाऱ्यात उडी मारलेला एक युवक पाण्यात गेला, तो पुन्हा वरच आला नाही. त्याला शोधण्यासाठी दुसऱ्या तरुणाने पाण्यात उडी घेतली आणि तोही पाण्यात गायब झाला. अखेर काल (सोमवारी) सायंकाळी उशिरा एकाचा, तर दुसऱ्याचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

वडुले बुद्रुक (ता. शेवगाव) येथील नंदिनी नदीवरील पुलाजवळ काल (सोमवारी) सायंकाळी उशिरा ही घटना घडली. ती आज उघडकीस आल्यानंतर गावावर शोककळा पसरली आहे. रजनीकांत ऊर्फ गुड्डू नंदू काते (वय 30) व अमृत रघुनाथ चोपडे (वय 38) अशी पाण्यात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. दोघेही वडुले बुद्रक येथील रहिवाशी असून, एकमेकांचे खास मित्र होते. 

 

TWO FRIEND DIE IN WATER

वडुले (ता. शेवगाव) : नंदिनी नदीवरील बंधाऱ्याजवळ झालेली नागरिकांनी गर्दी.                                                                                                         (छायाचित्र : राजू घुगरे) 

अशी घडली घटना.. 
रजनीकांत काते हा तरुण रविवारपासून (ता. 17) घरातून बेपत्ता होता. काल (सोमवारी) त्याचे कपडे व मोबाईल वडुले बुद्रुकजवळील शेवगाव-पांढरीपूल रस्त्यावरील नंदिनी नदीच्या पुलाजवळ आढळून आले. त्यामुळे गावातील नागरिकांना तो बंधाऱ्यातील पाण्यात बुडाल्याची शंका आली. त्यानुसार त्याचा पाण्यात शोध घेण्याचे ठरले. त्याला शोधण्यासाठी काल (सोमवारी) सायंकाळी चारच्या सुमारास अमृत चोपडे हा तरुण पाण्यात उतरला. मात्र, बराच वेळ झाल्यानंतर तोदेखील वर आलाच नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी जायकवाडी धरण परिसरातील मच्छिमार व पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांना याबाबत कल्पना दिली. मच्छिमार तरुणांच्या मदतीने बराच वेळ पाण्यात शोधाशोध झाली. 

अखेर सोमवारी सायंकाळी उशिरा चोपडे याचा मृतदेह सापडला. मृतदेहाच्या उत्तरिय तपासणीनंतर रात्री उशिरा चोपडे याच्यावर वडुले बुद्रक (ता. शेवगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अखेर कातेचा मृतदेह सापडला 
दरम्यान, रजनीकांत काते बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी सोमवारी (ता. 18) शेवगाव पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र, सोमवारी मच्छिमारांना त्याचा शोध लागला नाही. आज (मंगळवारी) सकाळीच सात वाजेच्या सुमारास व्यायामासाठी पुलाजवळून जाणाऱ्या काही नागरिकांना काते यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. त्यानंतर तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिस पाटील राजेंद्र पांजरे यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी काते याचा मृतदेह बाहेर काढला. उत्तरिय तपासणीनंतर त्याच्यावरही मंगळवारी वडुले बुद्रुक (ता. शेवगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत शेवगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Went in search of a friend and disappeared ..