पर्यटकांचा ओढा पश्‍चिम साताऱ्याकडे

Rain
Rain

सातारा - सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, खळाखळत वाहणाऱ्या नद्या, हिरव्यागार डोंगरांनी कवेत घेतलेले विस्तीर्ण जलाशय, हिरवीगार पठारे, मोकळे आणि स्वच्छ हवामान; एखाद्याचे मन रमायला आणखी काय हवे? अशा धुंद वातावरणात गरमागरम चहा, मक्‍याची कणसं, भाजक्‍या शेंगा, कुरकुरीत भजी असा खाशा बेत असेल तर मज्जाच! हा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची महाबळेश्‍वर- पाचगणीचबरोबर कास पठार, बामणोली, सज्जनगड- ठोसेघर, कोयनानगर आदी ठिकाणी गर्दी होऊ लागली आहे.

रिमझिम पाऊस, अंगाला झोंबणारा वारा आणि हिरवा निसर्ग, मुक्तपणे कोसळणारे धबधबे, शहर परिसरात उमललेली विविधांगी फुले आणि हिरव्यागार डोंगररांगाचे सौंदर्य टिपण्यासाठी पर्यटक निसरड्या वाटा धुंडाळताना दिसत आहेत. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दुचाकी, चारचाकीवरून मोठ्या संख्येने येत आहेत. निसर्गाचे शहारलेपण जवळून अनुभवण्यासाठी पर्यटकांचे पाय जिल्ह्याच्या पश्‍चिम भागाकडे वळली आहेत. हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा आणि कड्याकपारीतून कोसळणारे छोटे-मोठे फेसाळते धबधबे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.

महाबळेश्‍वर, पाचगणीचे टेबललॅंड, मिनी काश्‍मीर- तापोळा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, निसर्गरम्य कांदाटी खोरे, जागतिक वारसास्थळाचा दर्जा असलेले कास पठार व कोयना अभयारण्य या निसर्ग स्थळांबरोबरच पवन ऊर्जा प्रकल्पाचे जाळे असलेले चाळकेवाडी, प्रतापगड, सज्जनगड, अजिंक्‍यतारा किल्ला ही रम्य व ऐतिहासिक स्थळे पर्यटकांची आकर्षण केंद्रे बनलीत. ठोसेघर, सांडवली, केळवली, भांबवली (ता. सातारा), ओझर्डे (ता. पाटण), लिंगमळा (ता. महाबळेश्‍वर) येथील धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत. 

मंगळवार, शनिवार, रविवार, तसेच शासकीय सुटीच्या दिवशी या निसर्ग पर्यटन स्थळांकडे वाहनांची रीघ लागलेली दिसते. शनिवार सायंकाळीही कास रस्त्यावर जणू वाहनांची जत्रा भरल्यासारखी भासते. स्वातंत्र्य दिन, पारशी नववर्ष दिन, रविवार अशा एकदिवस आड येणाऱ्या सुट्यांमध्ये रजा टाकून पर्यटकांनी सहकुटुंब निसर्ग पर्यटनाचे मनसुबे आखलेले दिसतात.

इकडे लक्ष द्या ....
 जलाशयांच्या ठिकाणी बोटिंग करताना सुरक्षिततेत असलेल्या त्रुटी दूर करण्याची गरज 
 पर्यटनस्थळी निवास, भोजन, पाणी, रस्ते या प्राथमिक सुविधा हव्यात
 सर्व पर्यटन ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना, नजीक पोलिस चौकी हवी
 जिल्ह्यातील पर्यटन स्थळासंदर्भात इतर जिल्ह्यांत जाहिरात करावी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com