पश्‍चिम घाटात वनवैभवाला वणव्यांची झळ

शिवाजी यादव
गुरुवार, 27 एप्रिल 2017

वन्यजीव सैरभैर - सहा महिन्यांत ४० हून अधिक ठिकाणी वणवे

वन्यजीव सैरभैर - सहा महिन्यांत ४० हून अधिक ठिकाणी वणवे

कोल्हापूर - उन्हाळ्यात झाडांची पाने वाळलेली असतात; कोणी चुकून काडी ओढून टाकली, तरी बघता बघता जंगलात वणवा पेटतो. वनवैभव होरपळून जाते. नैसर्गिकरीत्या वाढलेली किंवा प्रयत्नपूर्वक वाढवलेली झाडे जागेवरच कोमेजू लागतात. अशा स्थितीत गेल्या सहा महिन्यांत पश्‍चिम घाटात जवळपास ४० ते ५० ठिकाणी वणवे लागले आहेत. वणव्यांची संख्या घटण्याऐवजी वाढत आहे, अशात वनविभागाकडे आग आटोक्‍यात आणण्यासाठी जेमतेम यंत्रणा आहे. त्यामुळे आग लावणाऱ्या माथेफिरूंना शोधणे व त्यांच्यावर कारवाई करण्याला अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे वणवे रोखण्यापासून स्वतंत्र पथकाची तयारी करण्याची गरज आहे. 

पश्‍चिम घाटातून सात राज्यमार्ग व एक महामार्ग जातो. दाजीपूर, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा, तिलारी, शाहूवाडी, पन्हाळा भागात घनदाट जंगल आहे. त्यामुळे पर्यटक व माल वाहतूक दिवस-रात्र सुरू असते. घनदाट जंगलात मध्यभागी आग लागण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे; पण मार्गालगत विरळ जंगल आहे. तिथे किंवा गवती भागात, डोंगरकपाऱ्यात आग लागली आहे. 

जंगलाजवळ कोणीतरी कचरा पेटविला किंवा काडी ओढून टाकल्याशिवाय आग लागत नाही. काही वेळा बेफिकीरीने कचऱ्याला आग लावली जाते. कचरा जळाल्यानंतर आग विझवली जात नाही. तेव्हा वाऱ्याने एखादी ठिणगी शेजारच्या गवतावर पडते. आग जंगलापर्यंत पोचते. क्वचित प्रसंगी वनक्षेत्रातून गेलेल्या विजेच्या तारांमधून होणाऱ्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येते; पण तशी लेखी नोंद मात्र अभावाने झाली आहे.     
आगीची माहिती अनेकदा वनविभागाला कळविलीच जात नाही. काही वेळा समजली तरी घटनास्थळी पोचेपर्यंत उशीर होतो. तेवढ्या कालावधीत जंगलाचा किंवा गवती कुरणांचा बहुतांशी भाग जळून खाक होतो. अशी आग कोणी लावली की कोणत्या कारणाने आग लागली, याचा शोध घेणेच अनेकदा कठीण होते. तेव्हा फक्त आग विझवणे एवढेच काम होते.  

जंगलाला आग लागली की, सरपटणाऱ्या प्राण्यांची अंडी जमिनीतील बिळात असतात तिथे पिल्लेही असतात, त्यांचा मृत्यू होतो. लहान प्राणी सैरावैरा धावतात, प्राण्यांचे स्थलांतर होते. तिथे नवीन प्राणी लवकर येत नाहीत. तेव्हा दहा किलोमीटर परिसरातील वन्यजीवांची अन्न साखळी बिघडते. उरले सुरले प्राणी, पक्षी गायब होतात. तेव्हा किटकांचा प्रादुर्भाव वाढतो.

पर्यावरणीय साखळी बिघडते. जंगलाच्या एखाद्या कोपऱ्यात कुठे तरी आग लागते. त्याची माहिती वनविभागाला पोचण्यास अर्धातास जातो. तिथून वनकर्मचारी घटनास्थळी जाण्यास वीस-पंचवीस मिनिटे लागतात. तुफान वाऱ्यामुळे आगीचे लोण वेगाने अंगावर येतात. अनेकदा डोंगर कपारीत लागलेल्या आगीपर्यंत पाण्याचा बंब पोचू शकत नाही. तेव्हा खांद्यावर फ्लो सिंलिंडर घेऊन आग विझविण्याचे काम वनरक्षकांना करावे लागते. यात आग विझविताना अनेकदा कर्मचारी घायाळ होतात. डोळ्यांच्या पापण्यांवरील केस जळालेले अनेक वनमजूर कोल्हापुरात आहेत. 

दृष्टिक्षेप 
पन्हाळा, गगनबावडा, राधानगरीत सर्वाधिक आगी 
बहुतांशी वेळा आगी दुपारीच लागल्या आहेत. 
आग लावणारा सापडल्याची घटना नाही, कारवाई अपवादानेच झाली.

जंगलातील प्रत्येक वनस्पती व वन्यजीवाचे पर्यावरणीय महत्त्व मोठे व मानवी हिताचे आहे. छोटीशी आग वर्षानुवर्षाच्या जंगली वैभवाला हानी पोचवते. जंगलात आग लागू शकेल, असे ज्वालाग्राही पदार्थ नेऊ नयेत. आग लागली असल्यास पाणी मारून प्रथम विझवावी. आग मोठी असल्यास तातडीने वनखात्याला कळवावे.       
- दत्ता पाटील, वनरक्षक

Web Title: western ghat forest fire