सांबरा परिसरातील भूसंपादनाचे काय?

शेतकऱ्यांतून प्रश्‍न; नवा रस्ता तारीहाळमार्गे होणार, प्रशासनाकडून बदल
हैदराबाद-पणजी राष्ट्रीय महामार्ग
हैदराबाद-पणजी राष्ट्रीय महामार्गSakal

बसवन कुडची - नव्याने होणारा हैदराबाद-पणजी राष्ट्रीय महामार्ग सांबरामार्गे न जाता तारीहाळ गावामार्गे होत आहे. मात्र, सांबरा परिसरात झालेल्या भूसंपादन प्रक्रियेचे पुढे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित करण्यात येत आहे.‌ हैदराबाद-पणजी राष्ट्रीय महामार्ग पूर्वी सांबरा रोडमार्गे यरगट्टी येथून पुढे जाणार होता, पण यात बदल करत नव्या राष्ट्रीय महामार्गासाठी तारीहाळ परिसरात भूसंपादन केले जात आहे. दोन वर्षापूर्वी बेळगाव-बागलकोट रस्ता रुंदीकरण करण्याच्या दृष्टीने बसवन कुडची परिसरातील शेतकऱ्यांना प्रांताधिकाऱ्‍यांनी भूसंपादनाची नोटीस बजावली होती.

भूसंपादनासाठी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. सांबरा रोडवर रस्त्याच्या मध्य रेखेपासून रस्त्याच्या दुतर्फा तीस फूट जागा सोडून बांधकाम करण्याची सूचना प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी शेतकऱ्यांना केली होती.‌ तसेच या जमिनीचे सर्वेक्षण करून त्याठिकाणी दगडही रोवले गेले. त्यानुसार बसवन कुडची बायपास रस्त्यावर नवी बांधकामे तीस फूट जागा सोडूनच करण्यात आली आहेत. आता हा रस्ता सोडून तारीहाळमार्गे नवा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने या जमिनींचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.

सांबरामार्गे नवा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी वायूदल केंद्राचीही महामार्ग प्राधिकरणाला अडचण होती. या ठिकाणी भूसंपादन करताना मोठ्या अडचणी येणार होत्या. येथे मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले असल्यामुळे भूसंपादन प्रक्रियेला विरोध होण्याची चिन्हे होती. भूसंपादनाची माहिती असूनही कर्नाटक पायाभूत सुविधा विकास मंडळाने बेळगाव-बागलकोट राज्यमार्गावर बसवन कुडची ते नेसरगीपर्यंत विकासकामे राबविली आहेत. अनेक ठिकाणी बसथांबे, पदपथ निर्माण केले आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणावेळी हे सर्व पुन्हा एकदा पाडावे लागणार होते. यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला असता.

कमी मोबदल्यात शेती गमावली

बसवन कुडची रस्ता हा सध्या चौपदरी असून तो सहा पदरी करण्याचा प्रस्ताव होता. यापूर्वीच बेळगाव-बागलकोट रस्त्यासाठी भूसंपादन करून रस्ता दुपदरीचा चौपदरी करण्यात आला आहे. त्यानंतर आता तीस फूट रस्त्यावर कोणतेही बांधकाम करू नये, अशी नोटीस शेतकऱ्यांना बजावली आहे. त्यात आणखी दहा फूट जागा रस्त्याच्या दुतर्फा घेण्याचाही शासनाचा विचार आहे. यामुळे अनेकांना आपली शेती गमवावी लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com