पन्नास गुणांचा निकष कशासाठी? 

संदीप खांडेकर  
सोमवार, 9 जुलै 2018

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित लॉ महाविद्यालयातील एलएल.बी. च्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना उत्तीर्णसाठी प्रत्येक विषयात पन्नास गुण मिळविताना घाम फुटत आहे. राज्यातील काही विद्यापीठांत उत्तीर्णतेसाठी ४० गुण असताना विद्यापीठात ५० गुण कशासाठी? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. किमान ४० गुणांना उत्तीर्णतेचा निकष असावा, अशी त्यांची मागणी आहे. 

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित लॉ महाविद्यालयातील एलएल.बी. च्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना उत्तीर्णसाठी प्रत्येक विषयात पन्नास गुण मिळविताना घाम फुटत आहे. राज्यातील काही विद्यापीठांत उत्तीर्णतेसाठी ४० गुण असताना विद्यापीठात ५० गुण कशासाठी? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. किमान ४० गुणांना उत्तीर्णतेचा निकष असावा, अशी त्यांची मागणी आहे. 

विद्यापीठाशी संलग्नित भारती विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज (कोल्हापूर), शहाजी छत्रपती लॉ (कोल्हापूर), भारती विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज (सांगली), एन. एस. सोटी लॉ, आय. एस. मुल्ला लॉ (सातारा), पी. डी. सी. लॉ (फलटण) व यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेजमधून (कऱ्हाड) विद्यार्थी लॉचे धडे घेत आहेत. पन्नास, ऐंशी-वीस, शंभर असा लॉ साठी गुणांचा पॅटर्न आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी पाच, तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. जे विद्यार्थी ऐंशी-वीस पॅटर्नप्रमाणे शिकतात, त्यांच्यासाठी ऐंशी गुणांची प्रश्‍नपत्रिका व वीस गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाते. 

विद्यार्थ्याला दोन्ही परीक्षांत मिळून चाळीस गुण मिळवावे लागतात. तरच तो उत्तीर्ण होतो. ही पद्धत प्रथम व द्वितीय वर्षासाठी असून, तृतीय वर्षात विद्यार्थ्याला पन्नास गुण मिळवावे लागतात. शंभर पॅटर्नला असणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेसाठी हाच निकष आहे. नांदेडच्या रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात ७५:२५, तर पुणे विद्यापीठात ८०:२० पॅटर्न आहे. केवळ शिवाजी विद्यापीठात आता थेट शंभर गुणांचा पॅटर्न आहे. 

औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तृतीय वर्षांतील विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात उत्तीर्णतेसाठी चाळीस गुण आहेत. मुंबई विद्यापीठात क्रेडिट सिस्टीम असल्याने तेथे ४० ते ५० टक्‍क्‍यांदरम्यान गुण मिळवावे लागतात. पुणे विद्यापीठात गतवर्षी पन्नास गुणांच्या उत्तीर्णतेच्या निकषाला विद्यार्थ्यांनी विरोध केला. त्यामुळे उत्तीर्णतेचा आकडा चाळीसवर केला गेला. 

शिवाजी विद्यापीठातील बोर्ड ऑफ स्टडीने तृतीय वर्षातील उत्तीर्णतेचा निकष पन्नास ठरविला आहे. तो चाळीस करावा, असा विद्यार्थ्यांचा आग्रह आहे. तशी मागणी जोर धरत आहे. एल. एल. बी. तृतीय वर्षातील विद्यार्थी ओंकार पाटील म्हणाला, ‘‘ज्या विद्यापीठांत चाळीस गुण दिले जातात. तेथे निकालाची टक्केवारी जादा लागते. प्रत्येक विषयात पन्नास गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मात्र कमी लागतो.’’ 

तृतीय वर्षाला चाळीस गुणांना उत्तीर्णतेचा निकष अमलात आणायचा असेल, तर त्याला सोपी प्रक्रिया आहे. तो विषय बोर्ड ऑफ स्टडी, फॅकल्टी, ॲकॅडेमिक कौन्सिल, मॅनेजमेंट कौन्सिल, सिनेटमध्ये मंजूर व्हावा लागतो. 
- डॉ. मंगला पाटील-बडदरे, प्राचार्या, भारती विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज.

Web Title: What is the criteria of fifty marks