रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काय झाले? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

सभापती धारेवर.. 
कामांच्या फायली मंजुरीनंतर सील करण्याचे अधिकार नगरसचिव व स्थायी सदस्याला असताना त्या सभापतींनी का रोखल्या आहेत? असा सवाल नगरसेवक दिलीप पाटील यांनी केला. नगरसचिवांच्या सहीने फाइल सील केली जाते. त्यानंतर त्या थांबविण्याचे कोणालाच अधिकार नाहीत. इथे भ्रष्टाचाराला वाव आहे. हाच काय तुमचा पारदर्शी कारभार? असा सवाल त्यांनी केला. सभापती संगीता हारगे यांनी मात्र विभागप्रमुखांकडून फायली आल्या पाहिजेत. ठेकेदारांनी त्या हाताळल्या तर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. 

सांगली - दीड वर्षापूर्वी झालेल्या प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणाचा मुद्दा आज स्थायी समितीच्या सभेत चांगलाच गाजला. या रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर टाकण्यात आली प्रत्यक्षात अनेक रस्ते खड्ड्यात गेले आहेत. प्रशासन केवळ ठेकेदारांना केवळ नोटिसा बजाविण्याचे नाटक करीत आहे, असा आरोप आज नगरसेवकांनी केला. 

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता येताच रस्त्यांसाठी 20 कोटींचा निधी दिला होता. त्यावेळी औद्योगिक वसाहत, शंभरफुटी, सिव्हिल रुग्णालय ते शंभरफुटी, लक्ष्मी देऊळ ते अहल्यादेवी होळकर चौक अशा विविध रस्त्यांचा समावेश होता. या रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांवर टाकण्यात आली आहे. दोन वर्षांच्या मुदतीत ठेकेदारानेच रस्त्यांची दुरुस्ती करावयाची आहे. ही मुदत ऑगस्ट 2017 मध्ये संपणार आहे. मग त्यांचे हे काम का झाले नाही?.. असा सवाल कॉंग्रेसच्या अलका पवार, संतोष पाटील, दिलीप पाटील यांनी केला. स्थायी समितीत कॉंग्रेस सदस्य विरोधी बाकावर गेल्याचा प्रत्यय आज आला. 

सौ. पवार म्हणाल्या, ""रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत आयुक्त व प्रशासन झोपले आहे. आता मुदत संपत आली असतानाही ठेकेदारांकडून कामे सुरू झालेली नाहीत.'' शिवराज बोळाज म्हणाले, ""प्रशासनाकडून ठेकेदारांना दोनदा नोटिसा बजाविण्यात आल्या. आता पुन्हा नोटीस काढली जाणार आहे. केवळ कागदांचा खेळ सुरू आहे. प्रत्यक्षात कार्यवाही काहीच होत नाही.'' 

औद्योगिक वसाहत ते अहिल्यानगर, संजयनगरमधील दोन रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराने हाती घेतले आहे. 17 पैकी केवळ दोनच ठेकेदार काम करीत आहते. उर्वरितांना नोटिसा देऊनही त्यांच्याकडून कामाला सुरवात नाही. महापालिकेने पॅचवर्कच्या 15 लाखांचे काम ठेकेदाराला दिले आहे. पण हा ठेकेदार कोण? हेच प्रशासनाला माहीत नाही. त्यात ठेकेदाराने रस्त्यावर खडी टाकली आहे, पण त्याच्याकडे डांबरासाठी पैसे नाहीत, अशी स्थिती आहे. मारुती चौक, हरभट रोड, तरुण भारत क्रीडांगणासमोरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. अधिकारी चार चाकीतून फिरतात, त्यांनी दुचाकीवरून शहरातून फिरावे, म्हणजे त्यांना खड्डे किती आहेत हे कळेल, असा चिमटा बोळाज यांनी काढला. 

स्थायीतील महत्त्वाचे 
मदनभाऊ स्मारकाचे काम रोखण्यासाठीच गेल्या आठवड्यात स्थायीची सभा न घेतल्याचा कॉंग्रेसचा आरोप. 
प्रदीप पाटील यांनी बदली कामगारांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव मांडला. 
अलका पवार यांच्याकडून कोल्हापूर रस्त्यावरील भोबे गटारीची पाइप जोडण्याची मागणी. 
पदभरतीच्या नव्या आकृतीबंधाला महासभा व स्थायीची मान्यता नसताना नोकरभरतीचा बोभाटा का? असा संतोष पाटील यांचा सवाल. 
वसंतदादा जन्मशताब्दीसाठी महापालिकेच्या वतीने समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवणार.

Web Title: What happened on the streets of maintenance repair