महापालिकेच्या अतिथीगृहाच्या जागेत काय करणार ?

बलराज पवार
Thursday, 17 September 2020

महापालिकेच्या अतिथीगृहाची इमारत धोकादायक झाल्याने पाडण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (ता. 18) रोजी होणाऱ्या महासभेसमोर आणला आहे.

सांगली : महापालिकेच्या अतिथीगृहाची इमारत धोकादायक झाल्याने पाडण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (ता. 18) रोजी होणाऱ्या महासभेसमोर आणला आहे. मात्र त्या मोक्‍याच्या जागेत काय करणार, त्याची नेमकी कार्यवाही काय केली आहे याचा आधी खुलासा व्हावा. घाईगडबडीने निर्णय नको. या महासभेत हा विषय प्रलंबित ठेवा अशी मागणी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी आज महापौरांकडे केली. 

ते म्हणाले,"" महासभेसमोरील सादर प्रस्तावात अनेक त्रुटी आहेत. भाडेकरून गाळेधारकांना नोटीसा दिल्या आहेत का, त्यांच्याबाबत प्रशासनाने कोणता निर्णय घेतला आहे, इमारतीचा स्ट्रक्‍चरल ऑडिट रिपोर्ट नेमका काय सांगतो याचा खुलासा आधी करा. त्यापेक्षाहीही महत्वाचे म्हणजे या जागेत आता करणार काय? याबाबत काही निविदा किंवा कार्यवाही केली आहे का याचा खुलासा होत नाही. 

महासभेने घाईने निर्णय घेतल्यास भविष्यातील नुकसानीला सर्व सदस्य जबाबदार असणार आहेत. परंतू याची जबाबदारी प्रशासनाने घेऊन त्याबाबत सविस्तर माहिती दिली पाहिजे. राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनीही महापौरांना असेच लेखी पत्र दिले आहे. हा विषय तुर्त प्रलंबित ठेवून पुढच्या महासभेत घ्यावा. शहर नागरी दारिद्‌य निर्मुलन कक्षाकडून आलेले दोन विषय आहेत. त्याच्या विषयपत्रातून सदरच्या प्रस्तावाबाबत नेमका खुलासा होत नाही. संबंधित अधिकारीही पार्टी मिटींगला हजर नव्हते. त्यामुळे ते विषयही प्रलंबित ठेवावेत. यावर सर्व विरोधकांचे एकमत आहे.'' 

मिरज हायस्कुल जागेवर पुन्हा डोळा 
महापौर संगीता खोत यांच्या काळात रद्द झालेला मिरज हायस्कुलच्या जागा विक्रीचा ठराव येत्या महासभेत चोरी छुपे मंजुरीचा डाव आखला जात आहे. उपमहापौर आनंदा देवमाने यांनी याबाबतचा ठराव एक ज अन्वये मांडला आहे. कारभाऱ्याच्या या कटाविरोधात मिरजेतील जनमत संघटित झाले असून पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सुरु झाली आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What will the municipal guest house space do?