व्हॉट्सॲप करा अन्‌ मदत मिळवा

Nirbhaya
Nirbhaya

कऱ्हाड - छेडछाड झाल्यानंतरही पोलिस ठाण्याची पायरी चढायची म्हटले, की महिला व तरुणींच्या मनात भीतीची पाल चुकचुकते. त्यामुळे तक्रार दिली जात नाही. त्यासाठी कऱ्हाड शहर पोलिसांच्या निर्भया पथकाकडून व्हॉटसॲप क्रमांकावर माहिती दिल्यास तत्काळ मदत केली जाणार आहे.

वर्धापनदिनाचे औचित्य साधून निर्भया पथकाचे हे महत्त्वाकांक्षी पाऊल ठरणार आहे. 

महिला, तरुणींच्या छेडछाडीच्या घटनांत अलीकडे वाढ झाली आहे. अशा प्रवृत्तींविरोधात कारवाई करण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना केली आहे. पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, शहर पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या या पथकाचे कामकाज पोलिस उपनिरीक्षक रूपाली चव्हाण, हवालदार रेखा देशपांडे, विनया वाघमारे, वैशाली कटरे या पाहात आहेत. त्या पथकाद्वारे पीडित महिला, तरुणींना मदत दिली जाते. या पथकाने आतापर्यंत अनेकांना मदत केली आहे, तरीही अनेकदा महिला व तरुणींच्या मनात तक्रार देण्याविषयी साशंकता असते. पोलिस ठाण्याची ससेमिरी मागे नको म्हणून त्या अनेकदा तक्रार देण्याचे त्या टाळतात. त्याचा विचार करून निर्भया पथकाच्या उद्या (ता. १५) होणाऱ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून अन्यायग्रस्त महिला, मुली, तरुणींना, त्यांच्या पालकांना मदत मिळावी या हेतूने निर्भया पथकाने ८३०८४६३१०० व ९९२३१०२३६८ हे दोन व्हॉटसॲप क्रमांक कार्यान्वित केले आहेत.

त्रास देणाऱ्या टोळक्‍याची, तरुणांची माहिती, फोटो, व्हिडिओ किंवा एसएमएस या क्रमांकावर पाठवल्यास निर्भया पथकाकडून तातडीने मदत दिली जाणार आहे. शिवाय माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. 

फ्लेक्‍सद्वारे जनजागृती 
निर्भया पथकाने मदतीसाठी सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमाची आणि व्हॉट्‌सॲप नंबरची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी कऱ्हाड शहरासह मलकापुरात फ्लेक्‍सद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. त्याद्वारे निर्भया पथकाशी संपर्क करावे, असे आवाहनही पथकाकडून करण्यात येत आहे.

निर्भया पथकाचा कारवाईचा धडाका 
निर्भया पथकाकडे येणाऱ्या तक्रार अर्जांचे प्रमाण मोठे आहे. तीन महिन्यांत ६९ अर्ज प्राप्त झाले होते. ते अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर ४१८ प्रतिबंधात्मक कारवायाही करण्यात आल्या आहेत. १३ दुचाकीस्वारांवर, तर शाळांजवळ धूम्रपान करणाऱ्या सहा जणांवर कारवाई केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com