व्हॉट्सअॅप ठरलाय कोल्हापूरचा आधार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

नागाळा पार्क, न्यू पॅलेस परिसरात अडकलेल्या नागरीकांनी व्हॉटस्अॅप मेसेज ब्रॉडकास्ट करून काल सकाळपासून मदतीची हाक दिली. पुराच्या विळख्यातील नागाळा पार्कात ९८ वर्षे वयाच्या वृद्धेला अस्वस्थ वाटू लागले, तेव्हा व्हॉटस्अॅप मेसेंजरवरून मेसेज ब्रॉडकास्ट करण्यात आला. बोटीतून स्वयंसेवक, वैद्यकीय पथक उपचारासाठी धावले. 

कोल्हापूर : जवळपास 70 टक्के शहर पंचगंगा नदीच्या महापुरात अडकले असताना मदतीसाठी व्हॉटस्अॅप मेसेंजर अॅप पूरग्रस्तांचा आधार ठरते आहे. पुरात अडकलेले आणि मोबाईल सुरू असलेले लोक व्हॉटस्अॅपवरून मेसेज पाठवून मदतीसाठी हाक देत आहेत. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलेले नागरीक, एनजीओ, सामाजिक संघटना, संस्था आणि खुद्द प्रशासनही व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून माहितीची देवाण-घेवाण करताहेत.

नागाळा पार्क, न्यू पॅलेस परिसरात अडकलेल्या नागरीकांनी व्हॉटस्अॅप मेसेज ब्रॉडकास्ट करून काल सकाळपासून मदतीची हाक दिली. पुराच्या विळख्यातील नागाळा पार्कात ९८ वर्षे वयाच्या वृद्धेला अस्वस्थ वाटू लागले, तेव्हा व्हॉटस्अॅप मेसेंजरवरून मेसेज ब्रॉडकास्ट करण्यात आला. बोटीतून स्वयंसेवक, वैद्यकीय पथक उपचारासाठी धावले. 

शहरालगतच्या प्रयाग चिखली, आंबेवाडीतील परिस्थिती बिघडत चालल्याचेही व्हॉटस्अॅपवरूनच लोकांना कळत राहिले. 

पुरग्रस्त सुरक्षितस्थळी हलविले जाऊ लागले, तस तसे त्यांच्या अन्न-वस्त्र-निवाऱयासाठी नागरीक, संस्था पुढे येत आहेत. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी असलेली तयारी, संपर्क क्रमांक व्हॉटस्अॅपवरून प्रसारित केले जात आहेत.

व्हॉटस्अॅपवरून येत असलेल्या संदेशांची खातरजमा करणे, जिल्ह्यातील पूरस्थितीची माहिती अद्ययावत करणे, पूरग्रस्तांच्या मदतीसाठीची व्यवस्था करणे आदींसाठी जिल्हा प्रशासनही व्हॉटस्अॅपचाच आधार घेत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whatsapp helps citizens in Kolhapur Floods