काळे धंदेवाल्याशी संबंधित पोलिसांवर कारवाई कधी? 

सुधाकर काशीद
गुरुवार, 11 एप्रिल 2019

मटका व अवैध व्यावसायिकांवर कारवाई होईल, पडद्याआड राहून मटका चालवणाऱ्यांचाही कदाचित शोध घेतला जाईल, पण पोलिस खात्यात राहून मटकावाले किंवा अवैध व्यावसायिकांशी लागेबांधे असलेल्या पोलिसांवर काय कारवाई होणार? हा यानिमित्ताने खुद्द पोलिस दलात चर्चेचा विषय आहे.

कोल्हापूर - मटका व अवैध व्यावसायिकांवर कारवाई होईल, पडद्याआड राहून मटका चालवणाऱ्यांचाही कदाचित शोध घेतला जाईल, पण पोलिस खात्यात राहून मटकावाले किंवा अवैध व्यावसायिकांशी लागेबांधे असलेल्या पोलिसांवर काय कारवाई होणार? हा यानिमित्ताने खुद्द पोलिस दलात चर्चेचा विषय आहे. वर्षानुवर्षे काळेधंदेवाले व पोलिसात अर्थपूर्ण संबंध जपणाऱ्या या ठराविक पोलिसांनीच पोलिस खात्याची प्रतिमा मलिन केल्याची भावना पोलिसांत आहे. बदल्या होऊनही काही वरिष्ठांच्या आशीर्वादाने हे ठराविक पोलिस कोल्हापुरातच आहेत. ते नेमके काय काम करतात?, वरिष्ठांची मर्जी कशी सांभाळतात? काळेधंदेवाल्यांच्या संपर्कात ते दर महिन्याला का राहतात? याचा वेध घेतला तर काळ्या धंद्यावर नेमका प्रकाश पडू शकणार आहे. 

कोल्हापूर पोलिसांची प्रतिमा बघितली, तर वेगवेगळ्या तपासात जरूर पोलिसांनी कौशल्य दाखवले आहे. ज्याचा तपास कधी लागेल, की नाही असे वाटणाऱ्या गुन्ह्यातील आरोपींना वर्ष दोन वर्षांत अटक केले आहे. ही एक बाजू असताना दुसरी बाजू मात्र काळ्या धंद्याच्या बजबजपुरीने काळंवडून गेली आहे. दोन मुख्य मटकाचालकांनी एकापेक्षा एक अशा 50 हून अधिक नामचिक लोकांना आपले एजंट म्हणून नेमले आहे. शिरोळपासून चंदगडपर्यंत त्यांनी तालुकेच आपापासात वाटून घेतले आहेत. या एजंटांनी आपापल्या हद्दीतील पोलिस ठाणी एलसीबी, डी. बी व्यवस्थित सांभाळली आहेत. त्यामुळे मटका अड्डे कोणालाही न जुमानता चालू आहेत. अक्षरशः रोज शेकडो कुटुंबांची धूळधाण हे मटकावाले करताहेत. एकीकडे सर्वसामान्यांची धूळधाण, तर मटकावाले गब्बर झाले आहेत. लोकांचे खिसे मोकळे करून मिळवलेल्या पैशावर आपण काहीही करू शकतो, हे मटकावाल्यांनी दाखवून दिले आहे. त्यांचे पोलिस खात्यातील ठराविकांनी असलेले संबंध यापूर्वी उघड झाले आहेत. इचलकरंजीतील एक पोलिसाला जो कलेक्‍टर म्हणून ओळखला जात होता. त्याची आता चौकशी चालू आहे, 

पण आजही ठराविक पोलिसांवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी विशेष ठेवण्याची गरज आहे. ते पोलिस दलासाठी काम करतात. की काळेधंदेवाल्यांसाठी हे पाहिजे पाहिजे. त्या पोलिसांचे गॉडफादर असलेल्या पोलिस निरीक्षकावरही लक्ष ठेवले पाहिजे. कारण मटका व काळे धंदे ठराविक पोलिस व त्यांच्या गॉडफादर अधिकाऱ्यांना रोखण्याची गरज आहे. त्यांना रोखले तर काळे धंदे रोखणे केवळ तासाभराचे काम राहणार आहे. 

"पाठराखीण पोलिस' अशी ओळख 
कोल्हापुरातल्या काही ठराविक पोलिसांची "पाठराखीण' अशी ओळख आहे. ते ज्या वरिष्ठाच्या हाताखाली काम करतात, त्या वरिष्ठांची बदली झाली की या ठराविक पोलिसांचीही बदली होते व तो पोलिस बदलीनंतर त्याच वरिष्ठांच्या हाताखालीच काम करतो. अशा पोलिसांची पोलिस खात्यात "पाठराखीण पोलिस' अशी ओळख आहे.

Web Title: When the action was taken against police related to black business