सोलापूरात ‘या’ ठिकाणी पैसेच पैसे? (Video)

अशोक मुरूमकर
Wednesday, 18 December 2019

जर तुम्हाला पैसे सापडले तर...
एखाद्या जागेवर तुम्हाला २०००, ५००, २००, १००, ५० रुपयांच्या नोटा सापडल्या तर... काय असेल तुमची प्रतिक्रिया? साहजिकच आहे तो त्याच्या गरजा भागवेल. मात्र, थोड्याच वेळात समजले की त्या बनावट नोटा आहेत. चीड येईल ना त्याची. काहींना वाटेल या नोटा का बनवतात. काहींना वाटेल यावर बंदी का येत नाही, असे एक ना अनेक प्रश्‍न मनात येतील.

सोलापूर : प्रत्येकजण पैसा, प्रतिष्ठा मिळावी म्हणून कष्ट घेत असतो. काहीजण तर पैशाच्या हव्यासापोटी नको ते उद्योग करत असतात. तर काहीजण प्रामाणिकपणे आहे त्या कामात किंवा नोकरीच्या ठिकाणी अतोनात कष्ट घेतात. मात्र, हेच पैसे तुम्हाला कुठे सापडले तर... काहीजण घेणार नाहीत, काहीजण कोणाचे असतील त्याला परत करण्याचा प्रयत्न करतील तर काहीजण त्याच पैशांवर काही गरजा भागवतील... पण तेच पैसे बनावट निघाले तर... त्यावर जबाबदार आणि सुशिक्षित तरुण व नागरिकाची काय प्रतिक्रिया असेल... त्यातून एखाद्याची फसवणूक होऊ शकते. अशा आपण अनेक घटनाही ऐकल्या आहेत. मग कोण यावर आळा घालणार?

Image may contain: shoes and outdoor

हेही वाचा : नाट्यवादळ विसावले!
नोटबंदीमुळे काय झाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २०१६ मध्ये ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या. त्यानंतर १००, ५०० व ५० रुपयांच्या नव्याने नोटा आल्या. त्यात २०० व २००० रुपयाच्या नोटांची भर पडली. या नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल असे सांगितले होते. मात्र, यातून किती काळा पैसा बाहेर आला, नोटबंदीचा उद्देश सफल झाला का? असे एक ना अनेक प्रश्‍न अजूनही केले जात आहेत. निवडणुकांमध्ये अजून त्यावर चर्चा होत असताना आपण पाहत आहोत. सध्या अशाच नोटांप्रमाणे दिसणाऱ्या बाजारात ‘मनोरंजन बँक’च्या नोटा आल्या आहेत.

म्हणून बंदी हवी...
या नोटांबद्दल सौरभ भोजने म्हणाले, मुलांच्या खेळण्यासाठी सध्या मनोरंजन बँक असे लिहिलेल्या ५००, २००, १००, २००० रुपयांच्या नोटा आल्या आहेत. आधीही अशा नोटा येतच होत्या. मात्र, या नोटांमधून फसवणूक होऊ शकते. ग्रामीण भागात अजूनही नागरिकांना खरी आणि खोटी नोट यामधला फरक सहसा समजत नाही.  अशी अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत. त्यात बनावट नोटा आल्या तर त्यांची फसवणूक होऊ शकते. सध्या आलेल्या नोटांमध्ये खूप छोटे बदल आहेत. ज्याला वाचता येत नाही त्याच्या हातात अशी नोट आली तर फसवणूक होऊ शकते. ते टाळण्यासाठी अशा नोटांवर बंदी आणायला हवी.

हेही वाचा : व्हॉट्‌सॲप बंद होणार?
शंका आल्यास नोट घेऊ नये

ज्ञानेश्‍वर पवार म्हणाले, मुलांच्या खेळण्यासाठी या नोटा असल्या तरी यातून फसवणूक होऊ शकते. सुशिक्षितांची सुद्धा यातून सुटका होणार नाही. कारण या नोटांमध्ये किरकोळ बदल आहेत. (हे नोटा पाहिल्यानंतर लक्षात येते) अंधारात किंवा विश्‍वासाने जर नोट पाहिली नाही तर त्याला कोण जबाबदार असणार. एका ठिकाणी मी तशाच नोटा पाहिल्या आहेत. नागरिकांनीही अशा नोटांवर विश्‍वास ठेवू नये. कारण नोट दिसायला जरी सारखी असली तरी हातात घेतल्यानंतर कागदामध्ये फरक जाणवतो. नोटांबद्दल शंका आल्यास ती नोट घेऊ नये किंवा संबंधितांशी संपर्क साधल्यास फसवणूक टळू शकेल. काहीवेळा मित्रांची सुद्धा मदत घेता येऊ शकेल.

 

हेही वाचा : सोलापुरात ‘नो व्हेईकल झोन’ कशासाठी? (व्हिडिओ)
मनोरंजन बँक असेल तर...

बँकांमध्ये बनावट नोटा आल्या आणि ते उघड झालं तर त्यावर कारवाई होऊ शकते. ती नोट सुद्धा जप्त केली जाते. मात्र, मनोरंजन बँक लिहिलेलं असेल तर लगेचच लक्षात येते. त्यावर बंदीबाबतचे अद्याप तरी काही माहीत नसल्याचे एका बँक अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

जर तुम्हाला पैसे सापडले तर...
एखाद्या जागेवर तुम्हाला २०००, ५००, २००, १००, ५० रुपयांच्या नोटा सापडल्या तर... काय असेल तुमची प्रतिक्रिया? साहजिकच आहे तो त्याच्या गरजा भागवेल. मात्र, थोड्याच वेळात समजले की त्या बनावट नोटा आहेत. चीड येईल ना त्याची. काहींना वाटेल या नोटा का बनवतात. काहींना वाटेल यावर बंदी का येत नाही, असे एक ना अनेक प्रश्‍न मनात येतील.

येथे पडल्या आहेत नोटा
सोलापुरात सध्या काही ठिकाणी स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच काम श्री सिद्धेश्‍वर मंदिरासमोरील जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्याचे सुरु आहे. या मंदिराच्या परिसरातच ॲडव्हेंचर पार्क आहे. हे पार्क सध्या बंद आहे. मात्र, त्याच्या प्रवेशद्‌वाराबाहेर २०००, ५००, २००, १००, ५० रुपयांच्या नोटांचे तुकडे पडले आहेत. यातील काही नोटांवर मनोरंजन बँक असे आहे. येथे काही दिवसांपूर्वी विक्रेते बसत होते. त्यांच्याकडून या नोटा पडल्या असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will fake money be banned