When will you stop Ganesh eikon disgrace
When will you stop Ganesh eikon disgrace

कधी थांबणार गणेशमूर्तींची विटंबना?

सोलापूर : मातीच्या गणेशमूर्तीच्या तुलनेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या म्हणजेच पीओपीचे गणेशमूर्ती स्वस्त असल्याने पीओपीच्या मूर्ती खरेदीकडे कल वाढला आहे. पीओपीच्या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नाहीत, त्यामुळे शहर आणि परिसरातील तलाव, विसर्जन कुंडाच्या ठिकाणी पाणी कमी झाल्यावर पीओपीच्या गणेशमूर्ती भग्नावस्थेत दिसून येत आहेत. हा विषय धार्मिक आणि भावनिक दृष्ट्या महत्वाचा असल्याने महापालिका प्रशासनाने कायमस्वरुपी तोडगा काढण्याची आवश्‍यकता आहे. 

शहरातील नागरिक सिद्धेश्‍वर तलाव, संभाजी तलाव, हिप्परगा तलाव आणि होटगी तलाव या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जित करतात. सिद्धेश्वर तलावांमध्ये दोन ठिकाणी विसर्जन कुंड बांधले आहेत, संभाजी तलाव परिसरात बांधलेले विसर्जन कुंड गायब झाले आहेत. इतर तलावांच्या ठिकाणी तर विसर्जन कुंड दिसून येत नाहीत. सिद्धेश्‍वर तलावातील पाणी कमी झाल्यानंतर गणपती घाट आणि विष्णू घाट येथील पीओपीच्या गणेशमूर्ती भग्नावस्थेत वर आल्याचे गेल्यावर्षी सर्वांनीच पाहिले आहे. पाण्यातून वर आलेल्या गणेश मूर्तींची विटंबना थांबवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह महापालिकेनेही प्रयत्न केले. तलावातील विसर्जन कुंडात पिण्याचे पाणी सोडावे लागले होते. 

धार्मिक आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गंभीर असलेल्या या समस्येमुळे निराशा झालेल्या महापालिकेचे निवृत्त आरोग्य निरीक्षक ज्ञा. गो. माणकेश्वर यांनी जुलै 2017 मध्ये शोभा बनशेट्टी, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख या सर्वांकडे लेखी निवेदन देऊन लक्ष वेधले. मात्र श्री. माणकेश्‍वर यांच्या निवेदनानंतर संबंधितांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आला नाही. पीओपीच्या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नाहीत, त्यामुळे पुणे महानगरपालिकेने आरसीएफ कंपनीकडून अमोनियम बायकार्बोनेट नावाची पावडर खरेदी करून ती नागरिकांना, गणेश मंडळांना दिली होती. सोलापुरातही ही पावडर महापालिकेने उपलब्ध करून द्यावी असे श्री. माणकेश्‍वर यांचे म्हणणे आहे. 

विरघळलेल्या पीओपीचा सायकल ट्रॅकसाठी वापर.. 
अमोनियम बायकार्बोनेट पावडरमुळे गणेश मूर्ती विरघळल्यानंतर त्या मातीचा सायकल ट्रॅकसाठी वापर केल्याची बातमीही मध्यंतरी वाचनात आल्याचे श्री. माणकेश्‍वर यांनी सांगितले. पुणे आणि नागपूर महापालिका प्रशासनाने विसर्जनानंतर पीओपीच्या गणेशमूर्तींचे काय करायचे याचा विचार केला आहे, पण आपल्या सोलापूर महानगरपालिकेने यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही. अनेकदा पाठपुरावा करूनही काहीच दखल घेतली जात नसल्याचे श्री. माणकेश्‍वर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अमोनियम बायकार्बोनेट पावडर पाण्यात मिसळल्यानंतर पीओपीच्या गणेशमूर्ती सहज विरघळतात. 

- पुणे महापालिकेने केलेला हा प्रयोग यशस्वी झाला आहे. 

- एक किलो मूर्तीसाठी दोन किलो अमोनियम बायकार्बोनेटची पावडर वापरली जाते.

- चोवीस तासात गणेशमूर्ती पूर्णपणे विरघळण्याचे दिसून आले आहे.

- नागपूर महानगरपालिकेनेही हा प्रयोग करून पाहिला आहे.

सोलापूर महानगरपालिकेने अमोनियम बायकार्बोनेट ही पावडर खरेदी करून विभागीय कार्यालयामार्फत सर्व नागरिकांना, गणेश मंडळांना मोफत उपलब्ध करून द्यायला हवी. आपल्या गणेशमूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करण्यास नागरिकांना प्रोत्साहन द्यावे. अमोनियम बायकार्बोनेटमुळे विरघळलेल्या गणेशमूर्तीची माती बागेमध्येही वापरता येऊ शकते. ही पावडर मोफत देणे शक्‍य नसेल तर नफा ना तोटा या तत्त्वावर प्रत्येकी दोन किलो विकत द्यावे. महापालिकेने तलाव परिसरातील मोठ्या हौदामध्ये ही पावडर टाकून त्याठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करावी. पावडरमुळे गणेशमूर्ती लवकर विरघळतील आणि विटंबना होणार नाही.
 
- ज्ञा. गो. माणकेश्‍वर, निवृत्त आरोग्य निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com