कुठं गेला पोलिसांचा दरारा?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

सांगली - पोलिस अधिकाऱ्याचे नाव जरी ऐकले तरी गुन्हेगार चळाचळा कापण्यासारखी परिस्थितीच आता राहिली नाही. दहा वर्षांपूर्वी पोलिसांचा जो दरारा, वचक होता तो अलीकडच्या काळात पुसला गेला आहे. त्यामुळे गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. दोन दिवसांपूर्वी फरारी भावशाने खून करून वचपा काढला. काल किरकोळ वादातून आल्लू मकाशी याने दोघांचा भोसकून खून केला. पोलिस ठाणे हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीकडे पोलिसांचे लक्षच नाही. केवळ ठाण्यात बसूनच अनेक अधिकाऱ्यांचे कामकाज सुरू आहे. गुन्हेगारांवर वचक आणि जनतेमध्ये आदर असणाऱ्या खमक्‍या पोलिस अधिकाऱ्यांची गरज आहे.

रेठरे धरणच्या भावशा पाटीलला सहा वर्षांपूर्वी विटा पोलिसांनी खूनप्रकरणी पकडले. तेव्हा तो पोलिसांनाच म्हणाला, ‘‘मला पकडून तुम्ही चूक केली. माझे काम अद्याप पूर्ण झाले नाही. ते मी करणारच’’. त्यानंतर भावशा इस्लामपुरात न्यायालय इमारतीवरून उडी मारून पळाला. पाच वर्षे वाट पाहून संताजी खंडागळे यांची गेम केली. सहा वर्षांत भावशाची साधी हालचालही पोलिसांना टिपता आली नाही. इथे पोलिसांचे खबऱ्याचे नेटवर्कच ‘आऊट ऑफ कव्हरेज’ असल्याचे दिसून आले. पुन्हा भावशा नाहीसा झाला.

सांगलीत काल आल्लू मकाशी याने किरकोळ वादातून दोघांना भोसकून मारले. तिसऱ्याला जखमी केले. आल्लू आणि मृत तरुण यांचे वेगवेगळ्या नावाने ग्रुप कार्यरत होते. त्यातून त्यांच्यात खुन्नस सुरू होती. ही खुन्नस पोलिसांच्या नजरेतून नेमकी सुटली. पोलिसांचे येथे खबऱ्याचे नेटवर्कच नसल्याचे समजले. कर्नाटकातून येथे स्थायिक होऊन डबल मर्डर करणाऱ्या आल्लू विषयी माहिती मिळणे तितकेच आवश्‍यक होते. गुन्हे प्रकटीकरण (डीबी) च्या कर्मचाऱ्यांना देखील उपनगरातील वाद निदर्शनास आला नाही. 
रेठरेधरण आणि सांगली येथे दोन दिवसात तिघांचा खून झाला. संजयनगर येथेही आठवड्यापूर्वी तरुणावर खुनी हल्ला झाला. गेल्या काही महिन्यांत हल्ला करण्याच्या घटना सांगली आणि ग्रामीण भागात घडल्या आहेत.

डॅशिंग पोलिस अधीक्षक म्हणून ख्याती असलेल्या दत्तात्रय शिंदे यांनी चार महिन्यांत चार टोळ्यांना ‘मोका’ लावून ऐतिहासिक कामगिरी केली. तसेच दोघांवर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली. एकीकडे ही कामगिरी दिसत असताना दुसरीकडे मोकाट गुंडही वरचढ ठरत असल्याचे चित्र दिसत आहेत.

सांगली, मिरजेसह जिल्ह्यात यापूर्वी अनेक डॅशिंग इन्स्पेक्‍टर येऊन गेले. त्यांचे नाव ऐकले तरी गुन्हेगारांचा थरकाप व्हायचा. परंतु दुर्दैवाने जिल्ह्यात अशा अधिकाऱ्यांची वानवा दिसत आहे. गुन्हेगारांवर तर दूरच, परंतु पोलिस कर्मचाऱ्यांवर देखील दबाव नसणारे काही अधिकारी पोलिस ठाणे चालवत आहेत. पोलिस ठाण्यापुरतेच त्यांचे काम दिसून येते. ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची आवश्‍यकता आहे.

हत्यारांचा खजिनाच-
सांगलीतील शंभरफुटी रस्ता, इंदिरानगर, संजयनगर, अहिल्यानगर, हनुमाननगर आदी ठिकाणी पोलिसांनी काटेकोर ‘कोंबिंग’ केले तर हत्यारांचा खजिना सापडला तर आश्‍चर्य वाटू नये. कारण किरकोळ कुरबुर झाली तरी हत्यार उपसले जाते, अशी परिस्थिती आहे.

Web Title: Where was the police awe?