कहाँ पे रखें हम ‘विश्‍वास’?

कहाँ पे रखें हम ‘विश्‍वास’?

नांगरे-पाटीलसाहेब, दोन दिवसांपूर्वीच आपण ‘निर्भया’ उपक्रमाच्या निमित्ताने सांगलीत आलात. महिलांच्या सुरक्षिततेविषयी आपण संवेदनशीलता दाखवत असताना मिरज शहरात एक पीडित महिला बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक व्हावी म्हणून पोलिस ठाण्यात खेटे घालत होती. मिरजेच्या या कुलौकिकावर पोलिसांनी यानिमित्ताने चार चाँद लावले. लोक त्रस्त आहेत. खड्ड्यांपासून अस्वच्छतेपर्यंत कारभाऱ्यांचे सारे काही सहन केले; पण आता सत्ता, पैशाच्या बळावर मदमस्त औलादी महिलांची अब्रू लुटून उजळमाथ्याने मोकाट फिरतात. हीच तुमची कायदा आणि सुव्यवस्था का? 

साहेब,

आपण कोकरूडसारख्या डोंगरी भागातून आलात. सांगली जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब. तुमच्या ‘मन में है विश्‍वास’ आत्मचरित्राचे आमच्या पलूस तालुक्‍यातील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी अक्षरशः पारायण केलं. पोलिस दलाबद्दल काही चांगलं बोलायची संधी यानिमित्ताने मिळाली. मात्र मिरजेतील त्या अभागी विवाहित तरुणीच्या आत्महत्येने साऱ्या जिल्ह्याला सुन्न करून टाकले. ही आत्महत्या की हत्या हेच आता ठरले पाहिजे. त्यासाठी हे अनावृत पत्र! 

साहेब, हा जिल्हा परवापर्यंत गृहमंत्र्यांचा जिल्हा म्हणून (आबांच्या काळात) गाजला आहे. येथे चार मंत्री असले तरी त्या काळात काही फार काही आबाद नव्हते. पण वर्दीवाले आबांना जरा टरकून होते. तेव्हा देखील मिरजेतील पोलिसांच्या गलथानपणामुळे धार्मिक एकतेला सुरुंग लागला. तो डाग अजूनही संवेदनमनाला अस्वस्थ करतोय! मिरजेतील मटका आणि अन्य काळे धंदे याबाबत लिहून आम्हा वृत्तपत्रांचा काही टन कागद वाया गेला तरी येथे फरक पडत नाही. सारेच पोलिस हप्तेखाऊ आहेत असे जनतेचे मत नाही. पण प्रत्येक माणूस तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्ही सांगलीत येऊन जनता दरबार घेतला तेव्हा मिरजेतील त्या अभागी पीडित महिलेची तक्रार का दरबारात पोहोचू शकली नाही, असा सवाल मनात डोकावतो!  येथे येणाऱ्या तक्रारींचेही आधीच सेटिंग झाले असते की काय? मटका बंद करा म्हणून टाहो फोडला, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तरी न जुमानणारी आणि हप्तेखोरी आणि तोडपाणीत बुडालेली तुमची येथील खाकी वर्दी, तेच तेच अधिकारी अनेकदा येथे ठाण मांडून राहतात... काही पोलिस स्टेशन म्हणजे अधिक कमाई देणारी काहींची दुकानदारी झाली आहे. इथले पोलिसही वर्षानुवर्षे इथेच तळ ठोकून असतात. इथली ठाणी म्हणजेच भ्रष्ट साखळी आहे. संवेदनाशून्य अशी ही व्यवस्था आहे.

 एक विवाहित महिला केवळ तिचे सर्वस्व लुटलं गेलं असताना आपला जीव भ्रष्ट व्यवस्थेसाठी डावावर लावते...आत्महत्येनंतर पोलिस चिठ्ठी गायब करतील म्हणून आपल्यावर बलात्कार झालाय, त्याला फाशीवर लटकवा म्हणून भिंतीवर लिहिते....आता एवढे झाल्यावर तुमचे डिपार्टमेंट सहा महिन्यांसाठी एक दोघांना सस्पेंड करेल....पुन्हा हे वर्दीतीले कसाई कोणत्या ना कोणत्या शहरात जाणार आणि पुन्हा एक ‘निर्भया’ त्यांच्या गलथानपणापुढे आहुती देणार?  सहा वर्षांची कोवळी पोर मागे टाकून जाताना त्या मातेला झालेल्या वेदना भ्रष्ट पोलिस यंत्रणेला जाणवतील का? तुमच्या वर्दीतील मारेकऱ्यांनी तिचे मातृत्व छिनलंय....

सारे पोलिसांचेच चुकतेय असेही आम्ही म्हणणार नाही. समाजाची संवेदनशीलता आटतेय. मिरजेत वीस वर्षांपूर्वी एका रितेश नावाच्या कोवळ्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या झाली होती. तेव्हा सारे मिरज समाजकंटकांच्या विरोधात एक झालेले पाहिले होते. पण मिरजकरांची संवेदना आता संपत चालली आहे. महापालिकेतील भ्रष्ट कारभाऱ्यापुढे मिरजकर शरण आहेत. काळेधंदेवाल्यांसमोर ते शरण आहेत. पण याला जशी राजकीय व्यवस्था जबाबदार आहे तितकेच भ्रष्ट अधिकारी आणि हप्तेखोरीत माणुसकी हरवलेले आपले वार्दीवालेही तितकेच जबाबदार आहेत. हा जिल्हा गुन्हेगारीत अव्वल स्थानावर राहिला आहे, ही शरमेचीच गोष्ट आहे. रोज एक ठिकाणी खून आहे. मिरजेत तर डॉ. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीतही खुनी हल्ले झाले. गणपती उत्सवात दंगली झाल्या. मिरजेतील बिघडलेली परिस्थितीला राजकीय नेत्यांकडून काही उत्तर मिळेल, अशीही आशाच संपलीय.

एवढे दिवस एखाद्या दिल्ली, मुंबईसारख्या महानगरातून वासनांधतेचे बळी इथली जनता माध्यमातून पाहात होती. पण आता राज्यात छोट्या शहरातूनही महिला सुरक्षित नाहीत, हे सत्य ‘मिरजे’तील घटनेने अधोरेखित केले आहे. कोपर्डीच्या अमानुष घटनेने राज्य सरकारची आणि गृहखात्याची मान खाली गेली असताना. उस्मानाबाद येथे रक्षकच भक्षक झाल्याचे उदाहरण पुढे आले असताना. विधानसभेत पोलिस डिपार्टमेंटची अब्रू चव्हाट्यावर निघत असताना पुन्हा मिरजेत तेच घडावे, ही गोष्ट अत्यंत लज्जास्पद आहे. 

आरोपी फरार आहे, सापडत नाही, शोध सुरू आहे, लोक समजू शकतात; पण आरोपी पोलिस ठाण्यासमोरून जात असताना पोलिसांनी त्याला मोकाट सोडून चक्‍क पीडित महिलेवर तत्परतेने खंडणीचा गुन्हा दाखल केला असेल, तर एवढी तत्परता पोलिस अधिकाऱ्यांच्या गल्लाभरू प्रवृत्तीमुळेच दाखवली जाते हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही. चित्रपटातील खलनायकाला शोभावे असेच हे कृत्य आहे. या घटनेच्या आधी सांगली पोलिसांनी महिला छेडछाड विरोधात पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली, तिने वरिष्ठांनाही पत्र लिहिले, आंदोलन केले, तरी आरोपी मोकाट सुटत... ही टीम केवळ प्रसिद्धीसाठीच आहे का?  महिनाभर आरोपी मोकाट आणि खंडणीचा गुन्हा मात्र तत्काळ. ती पीडिता आणखी एक दिवस जिवंत राहिली असती तर तिला पकडून तुरुंगात टाकण्याची मर्दुमकी तुमच्या पोलिसांनी नक्की दाखवली असती. हा बळी पोलिसी असंवेदशीलतचा आहे. हा बळी पैशाच्या राशीपुढे लोळण घेणाऱ्या पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. कारण खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय केवळ पोलिस निरीक्षक महिलेने घेतला, असे म्हणणे स्वतःचीच फसवणूक केल्यासारखे ठरेल. 

अतिशय पद्धतशीपणे एका ठाण्यात गुन्हा दाखल करायचा आणि दुसरीकडे तो वर्ग करायचा, अशी ही पोलिसी चलाखी आहे. ती तुम्हाला समजून सांगण्यासाठी आमची आवश्‍यकता नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या खात्यातले हे अस्तनीतले निखारे शोधून त्यांना पोलिस दलातून कायमचे विझवून टाकाल, अशी अपेक्षा. निदान त्यांच्यावर बडतर्फीची धडक कारवाई आपण कराल आणि त्या अभागी महिलेला न्याय मिळवून द्यायच्या लढ्यातील पहिला टप्पा पार कराल, या अपेक्षेसह....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com