`या` स्मार्ट सिटीचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा आज ठरणार 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

महापालिकेतील बलाबल 
भाजप (49), शिवसेना (21), कॉंग्रेस (14), एमआयएम (08), राष्ट्रवादी कॉंग्रेस (04), वंचित बहुजन आघाडी (03), बसप (01), माकप (01), एकूण (101). एमआयएमचे नगरसेवक तौफीक शेख यांचे सदस्यत्व प्रशासनाने रद्द केल्याने एमआयएमच्या नगरसेवकांची संख्या एकने कमी झाली आहे. 

सोलापूर ः स्मार्ट सिटीचा आगामी महापौर कोणत्या प्रवर्गातील असेल याचा निर्णय  आज बुधवारी होणार आहे. दरम्यान, या पदासाठीच्या दावेदारांनी आपले देव पाण्यात ठेवले असून, देवाने कोणाला कौल दिला हे दुपारी तीननंतर मुंबईत स्पष्ट होणार आहे. 

 

प्राध्यापिकेने केला यामुळे आत्महत्येचा प्रयत्न

 

महाराष्ट्र राज्यातील 27 महापालिकांतील महापौर पदाचे आरक्षण आज काढण्यात येणार आहे. नगर विकास विभागाचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात दुपारी तीन वाजता सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीवेळी महापौर, स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेत्यांना उपस्थित राहण्याचे पत्र नगर विकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी राज्यातील सर्व महापालिकांच्या आयुक्तांना पाठवले आहे. 

 

अबब... मटनाचा भाव वाढता वाढे...

 

सोलापूर महापालिकेत सध्या सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण आहे. विद्यमान महापौर शोभा बनशेट्टी यांची मुदत गत सात सप्टेंबरलाच संपली. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. त्यामुळे आता त्यांची मुदत सात डिसेंबर रोजी संपणार आहे. अलका राठोड, प्रा. सुशीला आबुटे आणि सौ. बनशेट्टी यांच्या रूपाने गेली साडेसात वर्षे महापौरपदी "महिलाराज'च होते. त्यामुळे यंदा तरी पुरुषांना संधी मिळेल, असा आशावाद नगरसेवकांतून व्यक्त होत आहे. यंदाचे आरक्षण सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी निघेल, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निघाले तर विद्यमान महापौर सोडल्या तर उर्वरित 48 जण इच्छुक आहेत. त्यामुळे महापौरपदाचा उमेदवार ठरविताना आम्हाला तारेवरची कसरत करावी लागेल. तथापि पद्मशाली समाजातील नगरसेवकाला महापौरपदाची संधी देण्यासाठी प्राधान्य असेल, असे भाजपच्या कोअर कमिटीतील सदस्याने "सकाळ'ला सांगितले.

 

काळजी करू नका फार दिवस नाही ः उदयनराजे

 

महापौरपदासाठी डॉ. किरण देशमुख, नागेश वल्याळ, राजेश काळे, अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यास प्रा. नारायण बनसोडे, रवी गायकवाड, संगीता जाधव, वंदना गायकवाड यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. कुणाच्या नावाला प्राधान्य द्यायचे हे आरक्षण निश्‍चित झाल्यावरच ठरणार आहे. 

 

लता मंगेशकरांच्या स्वाथ्यासाठी येथे झाली महाआरती

 

सोलापूर महापालिकेचे गत तीन टर्ममधील आरक्षणे 
2002-05 सर्वसाधारण महिला नलिनी चंदेले (कॉंग्रेस) 
2005-07 ओबीसी विठ्ठल जाधव (कॉंग्रेस) 
2007-09 सर्वसाधारण महिला अरुणा वाकसे (कॉंग्रेस) 
2009-12 सर्वसाधारण आरिफ शेख (कॉंग्रेस) 
2012-14 ओबीसी महिला अलका राठोड (कॉंग्रेस) 
2014-17 अनुसूचित जाती महिला प्रा. सुशीला आबुटे (कॉंग्रेस) 
2017-19 सर्वसाधारण महिला शोभा बनशेट्टी (विद्यमान - भाजप)  

 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Which category will the Mayor of this 'smart city' be today