आधी मदत पूरग्रस्तांना, नंतर सावरेन उध्वस्त घर! (व्हिडिओ)

आधी मदत पूरग्रस्तांना, नंतर सावरेन उध्वस्त घर! (व्हिडिओ)

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पंचगंगेच्या महापुरानं त्याचं घर जमीनदोस्त केलं. बायको-मुलं, कुटुंब उघड्यावर पडलं. पण, त्यानं नरवीर तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणं 'आधी पूरग्रस्तांना मदत, नंतर घराकडं लक्ष देईन...' या भूमिकेतून काम सुरूच ठेवलं. 13 दिवस उलटून गेले. कोल्हापूर परिसरात त्याचं पूरग्रस्तांच्या बचावाचं काम सुरुच आहे. तो आहे, कोल्हापुरातील व्हाईट आर्मी या आपत्तीकाळात धावून जाणाऱ्या संघटनेचा जवान सचिन भोसले!
 
८ ऑगस्टच्या रात्री कोल्हापूर नजीकच्या आंबेवाडी, चिखली या पुरात बुडालेलल्या गावांमध्ये बचाव कार्यात सचिन व्यस्त होता. अचानक त्याचा फोन खणखणतो, तो दुर्लक्ष करतो पण फोन पुन्हापुन्हा वाजायला लागतो...कोणाचा फोन म्हणुन  पाहतो तर, पलिकडे त्याच्या पत्नीच्या हुंदक्यांचा आवाज. रडता रडताच तिने सांगितलं, 

 "अहो, पावसानं आपलं घर जमीनदोस्त झालंय. आता काहीच संसार शिल्लक राहिलेला नाही..! "

हे ऐकुन सचिन हादरुन जातो. पण, ''तुम्ही सर्वजण सुखरुप आहात ना,'' एवढं पत्नीला विचारतो.



त्यावर ''आम्ही सगळे वाचलोत, पण अख्खा संसार मातीच्या ढिगार्‍याखाली गाडला गेलाय...'' असं पत्नी सांगते. पुढे तो पत्नीला सांगतो, " परत घर बांधू... नवीन संसार थाटु... तू मुलांना घेऊन पाहुण्यांकडे जा. आता मरणाच्या जबड्यात असलेल्या माणसांना वाचवणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. इथलं काम झालं की मी येतो घरी...'' 

सचिन कोल्हापूर नजिकच्या शिंगणापूर गावचा. तो गॅरेजमध्ये वाहन दुरुस्तीचं काम करतो. त्यावर कुटुंबाचा चरितार्थ चालवतो. पण, कधी कुणी संकटात सापडलं की, मदत करायला हा सर्वात आधी पोहोचतो. 

कोल्हापुरात १९९९ मध्ये व्हाईट आर्मी या आपत्तीग्रस्तांना मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासुन तो या संस्थेचा संस्थापक सदस्य आहे. देशभरातल्या अनेक आपत्कालीन परिस्थितीत सचिन धावला आहे. संकटातील अनेक जीव त्याने वाचवले आहेत. उत्तराखंडचा प्रलय, केरळचा पुर, माळीण गावची घटना, तिवरे धरणाची दुर्घटना ते हा कोल्हापूरचा महापूर... अशा कितीतरी घटना. 

अखंड पाऊस आणि चोहोबाजूला पाणीच पाणी अशा परिस्थितीत सचिन आणि व्हाईट आर्मीच्या टीमने कोल्हापूर, सांगलीत अक्षरक्ष: हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत. आंबेवाडी, चिखली, वाळवा, शिरगाव, हाळ, कारंजवाडी, सांगली, हरिपूर, सांगूलवाडी, शिरोळ या गावांतील हजारो नागरिकांना त्याने सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आहे.

आपलं घर जमिनदोस्त झालंय पण, आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत निस्वार्थीपणे इतर लोकांची घरं सावरत तो पुरातुन फिरत आहे. आपल्या पत्नीला, मुलांना मोहिमेवरुनच दिलासा देत आहे की, मी लवकरच परत येतोय. घर नव्याने बांधू. काळजी करू नका. 

मी माझं पडलेलं घर पाहायला गेलो तर, माझं मनोधौर्य कमी होईल, असं मला वाटलं. कारण मी खुप कष्टानं घर उभारलं होतं. घराकडं गेल्यावर पुन्हा बचाव मोहिमेवर येणं मुश्कील होईल. माझं एक घर पडलंय पण, इथे हजारो लोक पुरात अडकलेत. त्यांना वाचवणं माझं कर्तव्य आहे. - सचिन भोसले, जवान, व्हाईट आर्मी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com